देखणं आकर्षक

स्वप्नील मातोंडकर

हल्ली घरातील फर्निचरचा पॅटर्न बदललाय. वजनाला हलके, दिसायला देखणे, रंगीबेरंगी फर्निचर आले आहे.

आजकाल घराघरांमध्ये लाईट वेट फर्निचरची फॅशन आहे. खूप जड लाकडी फर्निचर जे पूर्वी टिकाऊपणाच्या नावाखाली हौसेनं घेतलं जायचं ती पद्धत मागे पडून वजनाला हलकं आणि दिसायला देखणं, रंगसंगतीच्या दृष्टीनेही नेत्रसुखद आणि वाजवी किमतीच्या फर्निचरचा नवा ट्रेण्ड सध्या बाजारात दिसून येत आहे.

देखणेपणा जोपासण्याबरोबरच कमीतकमी जागेत सोयीचे फर्निचर सेट करणे ही हल्ली प्रत्येक घराची गरज आहे. याकरिता ग्राहकांची गरज पूर्ण करण्याबरोबरच हलक्या फर्निचरला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पण ग्राहकांनी याचा विचार करताना काही गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे.

ग्राहकांना ग्रॅनाइड, मार्बल्स यांचे आकर्षण

पूर्वी घराघरांमध्ये शिसवी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडी फर्निचरला जास्त प्राधान्य दिले जायचे. कारण लाकडी फर्निचर घराचे सौंदर्य वाढवते. घरालाही एक वेगळाच लूक प्राप्त होतो. पावसाळ्यात त्याची विशेष काळजी घ्यावी लागते, मात्र आता ग्राहकांची आवड बदलत आहे. त्यामुळे आता त्याची जागा ग्रॅनाईडस, टाइल्स, सनमायका यांनी घेतली आहे. यामध्ये खूप प्रकार आहेत. हल्ली लॅमिनेटचाही ट्रेण्ड आहे. फक्त कोणतं मटेरियल कसं वापरायचं जेणेकरून ते आकर्षक दिसेल याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

वजनाला हलकं तरीही…

ग्राहक वजनाला हलक्या आणि रेडिमेड कपाट, शोकेस इत्यादी वस्तू वापरायला प्राधान्य देतात, पण अशा वस्तूंना हलकेपणा येण्यासाठी हल्ली प्लायच्या एमडीएफ हे मटेरियल वापरण्यात येते, पण हे मटेरियल टिकाऊ नाही, असे तज्ञांचे मत आहे.

हलकं फर्निचर वापरताना एखाद्या घराला वाळवीची समस्या किती आहे, घरात सामान किती आहे तसेच हलक्या फर्निचरची घराला कितपत आवश्यकता आहे, याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण वस्तू वापरताना तिच्यात टिकाऊपणा किती आहे हे तपासणे ग्राहकांसाठी गरजेचे आहे. तसेच रेडिमेड वस्तू वापरल्याने ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण होतातच असे नाही, याकरिता बनवून घेतलेले फर्निचर केव्हाही चांगले. कारण जे फर्निचर दिसायला चांगले आहे ते टिकायला चांगले असेलच असे नाही.

हल्ली घर, कार्यालयासाठी लागणारे फर्निचर, डेकोरेटिव्ह लाईटस् चायनाहून खरेदी करायला ग्राहक पसंती देत आहेत. कारण हे फर्निचर तुलनेने हिंदुस्थानातल्या फर्निचरपेक्षा स्वस्त आहे. उदा. दिसाजा टाइल्सची किंमत हिंदुस्थानातल्या फर्निचरच्या बाजारात ७०० रुपये स्क्वेअर फिट आहे, मात्र याच टाईल्सची किंमत चायनाच्या बाजारात १५० रुपये स्क्वेअर फिट अशी आहे.

रंग, लाईटसमुळे शोभा

फर्निचरची शोभा वाढवण्यात रंग आणि लाईटस् यांचा खूप महत्त्वाचा सहभाग आहे. एखाद्या भिंतीला कोणता रंग दिलाय,तसं फर्निचर, लाईटस् घरात लावणं गरजेचं असतं. – स्वप्नील मातोंडकर, इंटिरिअर डिझायनर