हार्दिकला वाईट पद्धतीने ट्रोल करणाऱ्यांना विरूने झापले; म्हणाला, “तो देखील आपल्याच…”

रोहित शर्माच्या जागी मुंबईच्या इंडियन्सचा नवीन कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली. पण रोहितच्या समर्थकांना हा निर्णय काही पटला नाही. कर्णधार म्हणून निवड झाल्यापासूनंच हार्दिक पंड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. असे असतानाच हिंदुस्थानचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने हार्दिकची पाठराखण करत ट्रोलर्सला चांगलेच झापले आहे.

विरेंद्र सेहवागने एका रिअॅलिटी शोला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. “कोणत्याही खेळाडूला ट्रोल नाही केलं पाहिजे. हार्दिक पंड्याला वाईट पद्धतीने ट्रोल करणाऱ्या प्रेक्षकांच्या वागण्याने मी निराश झालो आहे. असे ट्रोल करणे चुकीचे आहे. मग भले तो खेळाडू देशी असो अथवा विदेशी असो. तुम्ही सामना बघायला आला आहात, सामना बघा आणि तुमच्या संघाला पाठिंबा द्या. हार्दिक गुजरात सोडून मुंबईत आला याच्याशी तुमचे काही घेणे-देणे नाही. तो पण आपल्या देशाचा खेळाडू आहे. त्याला पण तेवढीच इज्जत आहे जेवढी इज्जत इतर खेळाडूंना आहे. ठिके तुम्ही नाराज आहात पण तुमचा राग तुम्ही वेगळ्या पद्धतीने व्यक्त करा, पण खेळाडूचा अपमान करू नका,” असे म्हणत विरेंद्र सेहवागने ट्रोलर्सला चांगलेच झापले आहे.