ज्योती मेटे यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला, निवडणूक लढवण्यावर ठाम

शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामाही दिला आहे. लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ज्योती मेटे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची चर्चाही सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज ज्योती मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली. कोणत्या पक्षाकडून लढायचे किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करायची याचा निर्णय दोन दिवसांत घेण्याचे संकेत यावेळी ज्योती मेटे यांनी दिले. ज्योती मेटे या शासकीय सेवेत असून त्यांनी आपल्या सहायक निबंधकपदाचा राजीनामा दिला आहे.