ईडी मला मिस करतेय, म्हणून वारंवार बोलावते; कार्ती चिदंबरम यांचा सणसणीत टोला

karti-chidambaram

कथित चिनी व्हिसाप्रकरणी सक्त वसुली संचालनालय (ईडी) ने काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना चौकशीसाठी पुन्हा बोलावले आहे. यावर कार्ती चिदंबरम यांनी ईडीला सणसणीत टोला लगावला. ईडीचे लोक मला मिस करीत असतात. ईडी कार्यालयात येणे हे आता नित्याचेच झाले आहे. यात नवीन काही राहिले नाही. आता ख्रिसमस सण आला आहे. शुभेच्छांची देवाण-घेवाण करण्यासाठी ईडीने बोलावले असेल, अशा शब्दांत कार्ती चिदंबरम यांनी ईडीला उपरोधिक टोला लगावला.

मी 20 व्यांदा ईडी कार्यालयात आलो आहे. माझ्याविरोधात तीन वेगवेगळय़ा गटात केसेस आहेत. पहिल्या गटाला फेक म्हटले आहे. दुसऱया गटाला जास्त फेक म्हटले आहे. तिसऱया गटाला सर्वात जास्त फेक म्हटले आहे. हे सर्वात जास्त फेक प्रकरण आहे. मला खरेच माहिती नाही यामागे कोण आहे. मला वाटतं यामागे चिनी भूत असेल, असा टोलाही कार्ती चिदंबरम यांनी लगावला. सीबीआयने हे प्रकरण बंद केले आहे, परंतु ईडीला पुन्हा या प्रकरणाला ओपन करून माझी चौकशी करायची आहे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. याप्रकरणी माझ्या वकिलांनी 100 पानांचे उत्तर ईडी कार्यालयात दाखल केले आहे. ईडीला जो तपास करायचा आहे. तो करू द्या. ईडीचे बोलावणे सुरूच आहे. 20 वेळा ईडी कार्यालयात आलो आहे, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, कार्ती चिदंबरम यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी पंजाबमध्ये एका वीज कंपनीचे काम पूर्ण करण्यासाठी चीनच्या 263 नागरिकांना अवैधरीत्या व्हिसा देण्यासाठी 50 लाख रुपये घेतले होते.