लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेस आजपासून सुरुवात; विदर्भातील पाच मतदारसंघांसाठी अधिसूचना जारी होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेस उद्या बुधवार, 20 मार्चपासून सुरुवात होणार आहे. विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघांसाठीची अधिसूचना जाहीर होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांत 19 एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया 20 मार्चपासून सुरू होणार असून 27 मार्चपर्यंत उमेदवारांना निवडणुकीसाठी आपले अर्ज दाखल करता येणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवातः     20 मार्च

अर्ज भरण्याचा अंतिम दिवसः   27 मार्च

उमेदवारी अर्जांची छाननीः        28 मार्च

अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवसः     30 मार्च

मतदानाचा दिवसः   19 एप्रिल

उमेदवाराला 95 लाख रुपये खर्चाची मर्यादा

लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला 95 लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरू करण्यात येईल. मात्र नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल.