मागोवा – क्या है ये राइट  ‘चॉइस’ बेबी?

>> आशा कबरेमटाले

महिला दिनी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतउंबरा ओलांडण्याऐवजीबाय चॉइसफक्त घर सांभाळणाऱया हुशार तरुणीच्या कौतुकाचा सूर दिसला. त्याविषयी

हिला दिनी अभिनेता अथर्व सुदामे याने रीलच्या स्वरूपात बनवलेला एक व्हिडीओ फेसबुक, व्हॉट्सअॅपवर अनेकांनी शेअर केला. जिथे तरुण पिढी अधिक सक्रिय आहे अशा इन्स्टाग्रामवर या व्हिडीओवर विरोधी प्रतिािढयाही दिसल्या. ‘कर्तृत्ववान’ असं शीर्षक असलेल्या या व्हिडीओतले काही संवाद असे :

तो : मग करतेयस काय हल्ली?

ती : सध्या मी घर सांभाळते.

तो : एवढी हुशार मुलगी घर सांभाळते!

ती : आजकाल घर सांभाळणं म्हणजे कर्तृत्व असं कुणाला वाटतच नाही यार! मी हे ‘बाय चॉइस’ करतेय. स्त्राrने घराचा उंबरा ओलांडला म्हणजेच कर्तृत्व असतं असं थोडीच असतं यार? फक्त पैसे कमावणं म्हणजेच कर्तृत्व नाही ना? कुटुंब जोडून ठेवणं यातसुद्धा कर्तृत्व आहेच की…

तो : प्रिय आई, काकू, ताई… बायको आणि आजी, तुम्ही कोणीच उंबरा ओलांडला नाही, पण त्यामुळेच आम्हाला घराची ओढ लागली. तुम्ही पैसा कमावला नाही, पण पैसा वाचवला. तुम्ही संस्कार केले, आयुष्याला आकार दिला. तुमच्या या सुपर पॉवरला सलाम!

घर सांभाळणाऱया स्त्रियांना ‘कर्तृत्ववान’ म्हणणं हे कुणालाही आवडावं असंच. निव्वळ महिला दिनीच नव्हे, तर सदोदितच सगळ्यांनी आपलं घर सांभाळणाऱया ‘ती’च्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. घर सांभाळणं हे उत्तम व्यवस्थापकीय कौशल्य लागणारं, कुटुंबातील प्रत्येकाच्या दैनंदिन जगण्याला आधार देणारं काम आहे. पण या व्हिडीओमध्ये ‘उंबरा ओलांडण्या’चा पुन: पुन्हा उल्लेख झाल्याने त्याविषयी काही नकारात्मकता आहे की काय, अशी शंका येते. म्हणजे कर्तृत्व गाजवण्यासाठी स्त्रियांना उंबरा ओलांडण्याची गरज नाही. घर सांभाळा आणि त्याच कर्तृत्वात आनंदी रहा, असं सांगण्याचा हेतू तर यामागे नाही ना? व्हिडीओतली ‘ती’ म्हणते, मी मुलाचा अभ्यास घेते, बॅडमिंटन खेळते, फिट आहे. थोडक्यात, ती उंबरा न ओलांडूनही आनंदी आहे!

‘उंबरा ओलांडणाऱया’ म्हणजेच नोकरी/व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱया स्त्रियाही घर सांभाळणं, मुलांवर संस्कार करणं ही कामं करतच असतात हे व्हिडीओच्या कर्त्यांना ठाऊक आहे ना? नोकरी करणाऱया स्त्रियांच्या पहिल्या पिढीने घरचं-बाहेरचं सारं स्वत:च करण्याचा नको इतका ताण सोसला. आताची नोकरदार स्त्राr काही कामांसाठी बाईची मदत घेते, पण त्यापलीकडेही घर सांभाळणं श्रेणीत मोडणारी असंख्य कामं असतातच.

मूळ प्रश्न हा आहे की, असा फक्त घर सांभाळण्याचा ‘चॉइस’ आज किती जणींना परवडू शकतो? पूर्वीसारखी नोकरीची शाश्वती नाही, पगार कपात होऊ शकतो, नव्या तंत्रज्ञानामुळे नोकऱया जातात. आजचं वास्तव हे असताना किती कुटुंबं एकाच्या पगारावर विसंबू शकतात? मुलांच्या शिक्षणाचा अफाट खर्च, घर-गाडीसाठी काढलेल्या कर्जांचे हप्ते. कोविडनंतर तर कुणालाही कधीही काहीही होऊ शकतं हे कटुसत्यही कळून चुकलं आहे. मग हुशारी व शिक्षण असलं तरी ‘बाय चॉइस’ फक्त घरच सांभाळण्याचा पर्याय निवडा, असं तरुणींना सुचवणं कितपत योग्य आहे?

महाराष्ट्रात जितक्या सहजपणे स्त्रिया घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करतात, तशी संस्कृती आजही उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये नाही. आपल्याला त्या संस्कृतीचे गोडवे तर नाही ना गायचे? तसं कुणी सुचवू पाहत असेल तर त्याला वेळीच विरोध केलेला बरा. असे भस्मासुर मोठे व्हायला वेळ लागत नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या कुणी स्त्रिया ‘बाय चॉइस’ अशी फक्त ‘घर सांभाळण्याची’ जबाबदारी स्वीकारतात, त्या या निर्णयाबाबत किती काळ समाधानी राहतात याचा अवतीभवती अंदाज घेणं उचित ठरेल. नवऱयाला गलेलठ्ठ पगार असला, कमवून आणण्यासाठीचा दबाव नसला तरी अशी घरी बसलेली स्त्राr कितीतरी असमाधानी असते हे चार जणींशी बोललं तर कळून येईल. एकूणात ‘बाय चॉइस’ निव्वळ घर सांभाळण्याचा पर्याय व्हिडीओत भासवला आहे तसा कायमस्वरूपी छान छान नसतो.

कधीकाळी निव्वळ ‘घर सांभाळण्याचा’ निर्णय घेतलेल्या अनेकजणी पुढे घर सांभाळण्याला अन्य कुठल्या तरी कामाची जोड देऊन स्वत:ची अधिकची ओळख निर्माण करू पाहतात. किमान तशी इच्छा तरी असते. या मानसिकतेमुळेच जाहिरातींमध्ये ‘घर सांभाळणाऱया’ स्त्रियांना ‘टिफिन सर्व्हिस सुरू करणं’, ‘स्वत:चं केक शॉप उघडणं’ असे पर्याय सुचवलेले दिसतात.

‘उंबरा ओलांडण्या’मागे आर्थिक उत्पन्न हे कारण असतं, पण अनेक जणींसाठी आपलं काम, कौशल्य ही आवडीची गोष्ट असते. कामातून फक्त पैसा मिळत नाही, अपार समाधानही मिळतं. काम तुमची ‘ओळख’ असते!

शिवाय, घर जर सगळ्यांचं, तर ते एकट्या स्त्राrनेच का सांभाळायचं? नवऱयाला बाहेर कर्तबगारी गाजवता यावी, मुलांच्या आयुष्याला आकार मिळावा म्हणून तिने त्याची किंवा सगळ्यांनी मिळून करण्याची कामं एकटीने करत राहायची? ‘घर सांभाळणाऱया’ अनेकजणी या दुय्यम भूमिकेमुळे व्यथित असतात. आपल्याला अमुक काम करायला आवडलं असतं अशी खंत बाळगतात.

काहीजणी वर्षानुवर्षे घरात अडकून पडल्यामुळे बाहेरच्या जगात वावरताना पावलोपावली अडखळतात. आपल्याला मदतीशिवाय कुठे जाता येत नाही, साधंसुधं नवीन तंत्रज्ञानही हाताळता येत नाही याची बोच त्यांना असते. ही अशी अवस्था स्त्राrने कशासाठी ओढवून घ्यायची?

आजची एकंदर अनिश्चितता पाहता प्रत्येकीने ‘घर सांभाळण्या’खेरीज इतरही कौशल्यं शिकून घेणं, बाहेरच्या जगाविषयी, तंत्रज्ञानाविषयी अपडेटेड राहणं गरजेचं आहे. म्हणूनच ‘उंबरा न ओलांडण्याचं’ कौतुक टाळायला हवं. …आणि पुरुष निव्वळ ‘घर सांभाळण्याचा’ हा चॉइस कधी करणार? असाही प्रश्न विचारता येऊ शकतोच. अशा पुरुषांचाही ‘कर्तृत्ववान’ म्हणून गौरव कधी करणार! असो, स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा तो विषय पुन्हा कधीतरी.

[email protected] 

(लेखिका माध्यमक्षेत्रात कार्यरत आहेत.)