शरीरात दारूचा एक थेंबही आढळला तर मी जिवंत समाधी घ्यायला तयार; मनोज जरांगे पाटील यांचे भुजबळांना खुले आव्हान

मराठी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत होत्या. आता जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना थेट खुले आव्हान दिले आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर वैयक्तिक टाकी करत असून आरोप-प्रत्यारोपांनी खालची पातळी गाठली आहे. सतत दारू पिऊन मनोज जरांगेंच्या किडण्या खराब झाल्या असल्याची टीका ओबीसी एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळांनी केली होती. या आरोपाला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून भुजबळ यांना खुले आव्हानही दिले आहे.

छगन भुजबळांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी याआधीच भुजबळांना चॅलेंज दिले होते. आज पुन्हा हे चॅलेंज देतो. मी जन्मल्यापासून आजपर्यंत एकदाही दारू प्यायलेली नाही. माझी नार्को टेस्ट करा. शरीरात दारूचा एक थेंबही आढळला तर मी जिवंत समाधी घ्यायला तयार आहे. पण दारू न आढळल्यास भुजबळांनी समाधी घ्यावी, असे खुले आव्हान जरांगे पाटील यांनी दिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर टीका केली आहे. गिरीश महाजन यांनी सांगितल्यामुळे मागील दोन दिवसांपासून आम्ही भुजबळ यांच्याबद्दल एकही शब्द काढत नव्हतो. पण त्यांनी पुन्हा माझ्यावर टीका केली. ते बोलल्यावर मी शांत कसा बसणार? ते आता बधीर झाले असून त्यांना गोळ्या सुरू करण्याची गरज आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला आहे.

भिवंडी येथे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार मेळावा झाला. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत त्यांच्यावर टीका केली होती. त्याला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देत भुजबळ यांना खुले आव्हान दिले आहे.