…घडयाळातली वेळ बदलून त्याचे बारा वाजलेले असतील; रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला सशर्त घड्याळ चिन्ह वापरायला परवानगी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विनाशर्त तुतारी चिन्ह दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने अजित पवार गटाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अजित पवार गटाने इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांमध्ये नोटीस जारी करावी आणि प्रचाराच्या सर्व जाहिरातींमध्ये असे नमूद करावे की, त्यांना निवडणूक आयोगाने दिलेले ‘घड्याळ’ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष या नावाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निकालानंतर रोहित पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्या गटावर निशाणा साधला आहे.

आदरणीय पवार साहेबांचं नाव न वापरण्याचं हमीपत्र देण्याचे आणि पक्ष व घड्याळ चिन्हाचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने ते तात्पुरतं असल्याची जाहीरात देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने फुटीर ‘अजितदादा मित्र मंडळा’ला दिल्याने या मंडळाची अवस्था आगीतून उठून फुपाट्यात पडल्यासारखी झालीय. एकतर भाजप वापरुन घेतंय आणि आता न्यायालयीन निकालाच्या अधिन राहून (अटी लागू) अशी अट खुद्द न्यायालयानेच घातल्याने या मंडळाच्या विश्वासार्हतेचा जाहीर पंचनामाच झालाय. आता या मंडळाला लोकसभेसाठी चार जागा तरी मिळतील की नाही, याची शंका आहेच पण विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत यांच्या हातात घड्याळही राहणार नाही आणि त्यातली वेळही बदलून बारा वाजलेले असतील, यात शंका नाही. दुसरीकडं ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाला तुतारी चिन्हावरच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढण्यास मान्यता देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असून याबाबत न्यायालयाचे आभार!, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.