जाहीरनाम्यातील प्रत्येक मुद्दा घराघरांत न्या

लोकांना, देशाला बदल हवा आहे. यासाठीच आपल्या जाहीरनाम्यातील न्याय आणि हमींशी निगडित प्रत्येक मुद्दा अगदी गावपातळीवर घराघरांपर्यंत घेऊन जा, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज येथे केले.

दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचा प्रस्तावित जाहीरनामा, संभाव्य उमेदवारांची नावे, राहुल गांधी यांच्या यात्रांमधून समोर आलेले लोकांचे प्रश्न, मुद्दे तसेच निवडणूक जाहीरनाम्यावर बैठकीत 3 तासांहून अधिक काळ सविस्तर चर्चा झाली. जाहीरनामा समितीने हा मसुदा आधीच मंजुरीसाठी कार्यकारिणीकडे पाठवला होता. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अंबिका सोनी, पी. चिदम्बरम, अजय माकन, सचिन पायलट, दिग्विजय सिंह, कुमारी सेलजा यांच्यासह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीतील संभाव्य उमेदवारांच्या नावांवरही आज चर्चा झाली.

पाच न्याय, पंचवीस हमी

भागीदारी, शेतकरी, नारी, श्रमिक आणि युवा वर्गाला योग्य न्याय देण्यासाठी प्रत्येक वर्गासाठी पंचवीस आश्वासनांची घोषणा आधीच काँग्रेसने केली आहे.

नारी न्याय हमी योजना

काँग्रेसने नारी न्याय हमी योजना आणण्याचे आश्वासन दिले आहे. गरीब महिलांना दरवर्षी एक लाख रुपयांची मदत करण्याची हमी काँग्रेसने दिली आहे. तसेच सरकारी नियुक्त्यांमध्ये महिलांना समान संधीचे आश्वासन दिले आहे. आमची गॅरंटी म्हणजे पोकळ आश्वासने आणि विधाने नाहीत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आमचे शब्द दगडावरील रेघ आहे, असे खरगे यांनी म्हटले आहे.