मराठवाड्यात दुसर्‍या दिवशीही अवकाळी पाऊस, वीज पडून तीन जणांचा मृत्यू

मराठवाड्यात सलग दुसर्‍या दिवशीही अवकाळी पावसाने बीड, लातूर, जालना जिल्ह्यास झोडपून काढले. अवकाळीने दिलेल्या तडाख्याने शेतशिवाराची रया गेली असून आंबा, सीताफळ, डाळिंब, पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. वीज पडून मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, अवकाळी पावसाचा जोर 15 एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गुरूवारी बीड जिल्ह्याला दोन तास अवकाळी पाऊस, गारपिटीने झोडपून काढले. अवकाळी पावसाचा जोर एवढा होता की भर उन्हाळ्यात नदी, नाले खळाळून वाहिले. या पावसाने जिल्ह्यातील फळबागा, मिरची, उन्हाळी बाजरी तसेच मक्याचे अतोनात नुकसान झाले. केशर आंब्याचा सडाच पडला. टरबुजाची प्रचंड नासाडी झाली. शुक्रवारीही गेवराई, वडवणी, अंबाजोगाईला अवकाळीने दणका दिला. माजलगाव, परळीतही दिवसभर पावसाळी वातावरण होते. गेवराई तालुक्यात मन्यारवाडी शिवारात वीज पडून मीना गणेश शिंदे (35) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा ओंकार (15) हा गंभीर जखमी झाला.

छत्रपती संभाजीनगर, जालन्यालाही तडाखा

बीड, लातूर पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, जालन्यासही अवकाळीने चांगलाच तडाखा दिला. पैठण तालुक्यात टाकळी अंबड येथे वीज पडून सुधाकर पाचे या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातही अनेक ठिकाणी अवकाळीने दाणादाण उडवली. उंडणगाव येथे मोटारसायकलवर वीज पडल्याने जाबेर शेख रऊफ (22) हा ठार झाला तर त्याची आई हाजराबी ऊर्फ शबाना शेख रऊफ (45) या गंभीर जखमी झाल्या.