मी दुसर्‍याची तिजोरी फोडून श्रीमंत झालो यात अभिमान कसला? किरण मानेंचा टोला

अभिनेते किरण माने वेगवेगळ्या मुद्द्यांवर परखड मते व्यक्त करत असतात. तसेच त्यांच्या वक्तव्यांची चर्चाही होत असते. आता त्यांनी एक्सवर राजकीय पोस्ट शेअर केली आहे. त्याचीही सोशल मिडीयावर चर्चा असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमधून त्यांनी नेमका कोणावर निशाणा साधला आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

किरम माने यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी दुसऱ्याची तिजोरी फोडली आणि श्रीमंत झालो यात अभिमान कसला? शरम वाटली पाहिजे. तुला तुझ्या हिमतीवर एक पै कमावता आली नाही, हा तुझा नाकर्तेपणा आहे. तुझा एकही ‘बंदा’ तुला मोठा करता आला नाही. फोडून आणलेल्या खजिन्यातल्या चवल्या-पावल्यांचा तुला सतत टेकू लागतो. तू सगळ्यात मोठा दरिद्री आहेस. या पोस्टला त्यांनी #ज्याची_लाज_त्याचाच_माज असा हॅशटॅग दिला आहे.

किरण मानेंची ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमधून माने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे, अशी चर्चा होत आहे. फडणवीस यांनी नुकतेच वक्तव्य केले होते की, मी म्हटलं होतं की मी पुन्हा येईन. त्याला अडीच वर्षे लागली. परंतु, अडीच वर्षांनी आलो तर असा आलो की दोन पक्ष फोडून आलो. फडणवीस यांच्या या विधानावर आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधकांनी टीका केली होती. तसेच फडणवीस हे फोडाफोडीचे महामेरू आहेत, असे रोहित पवार म्हणाले होते. आता माने यांच्या पोस्टचा रोखही फडणवीस यांच्यावरच आहे, अशी चर्चा होत आहे.