रेसकोर्सवरून थेट कोस्टल रोड उद्यानात

पालिकेला रेसकोर्सच्या मिळालेल्या 120 एकर जमिनीवर पालिका मुंबई सेंट्रल पार्क तयार करणार असून हे सेंट्रल पार्क कोस्टल रोडच्या प्रकल्पात तयार करण्यात येणाऱया 170 मीटर जागेवरील उद्यानाला भुयारी मार्गाने जोडण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांना सुमारे 300 एकर जागेवरचे उद्यान उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाची पाहणी आज नवनियुक्त पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी केली. यावेळी कोस्टल रोडचे काम वेगाने करण्याचे निर्देशही त्यांनी आज यंत्रणेला दिले.

भूषण गगराणी यांनी कोस्टल रोड आणि मुंबई सेंट्रल पार्क प्रकल्पांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी,  उपआयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम आणि संबंधित अधिकारी तसेच मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडचे सचिव निरंजन सिंग आदी उपस्थित होते.

आपत्कालीन यंत्रणा यशस्वी

या पाहणी दौऱयादरम्यान आयुक्तांनी आपत्कालीन संपर्क यंत्रणेद्वारे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून यंत्रणा तत्परतेने कार्यरत असल्याची खातरजमा केली. दोन्ही जुळय़ा बोगद्यांना जोडणारे छेद बोगदे, त्याचप्रमाणे उत्तर दिशेच्या वाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या भुयारी बोगद्याची त्यांनी पाहणी केली.

लवकरच गर्डर लाँच

कोस्टल रोड वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडण्यासाठी 120 मीटर लांब अडीच हजार टनाचा गर्डर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात लाँच करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधान्याने कामे सुरू आहेत, असे कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता निकम यांनी नमूद केले.