वहिनीचा खून; दिराला जन्मठेपेची शिक्षा

 

अनैतिक संबंध तोडल्यामुळे वहिनी सुनीता लोखंडे (वय 30) हिचा खून केल्याप्रकरणी दीर आरोपी पांडुरंग कामू लोखंडे (वय 33, रा. खिलारवाडी, ता. जत) याला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील जे. के. लक्का यांनी काम पाहिले.

खिलारवाडी येथे लोखंडे कुटुंब राहते. आरोपी पांडुरंग आणि मयत सुनीता यांच्यात अनैतिक संबंध होते. याची माहिती कुटुंबीयांना झाल्यानंतर त्यांनी सुनीताला समजावून सांगितले. त्यामुळे तिने पांडुरंग याच्याशी संबंध तोडले. त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता. तिला सतत विचारणा करत होता. 30 डिसेंबर 2018 रोजी पांडुरंग याने तिला राहत्या घरातून बाहेर आणून स्वतःच्या घरात ओढत नेले. दरवाजाला आतून कडी लावून सुनीताच्या डोक्यात, तोंडावर, पाठीवर, पोटावर चाकूने वार करून निर्घृण खून केला.

याप्रकरणी मयत सुनीताच्या पतीने जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी पांडुरंग व त्याच्या साथीदाराला अटक केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते. या खटल्यात सरकारतर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी मृत सुनीताचा पती आणि साक्षीदार त्याची आई हे दोघेजण फितूर झाले. परंतू सरकारी वकील जे. के. लक्का यांनी शिक्षेच्या मुद्दय़ावर जोरदार युक्तिवाद केला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. सामाजिक आणि वैयक्तिक दोन्ही स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे आरोपीला कोणतीही सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. त्यानुसार न्यायाधीश शर्मा यांनी आरोपी पांडुरंगला जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.

जत पोलीस ठाण्यातील हवालदार कलगुटगी, रोहित कोळी, पैरवी कक्षातील टी. बी. बंडगर यांनी तसेच पैरवी कक्षातील पोलिसांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.