इलेक्टोरल बॉन्ड हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा, अर्थमंत्र्यांच्या पतीचा गंभीर आरोप

इलेक्टोरल बॉन्ड हा देशातीलच नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून भाजप आणि हिंदुस्थानी नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण होईल, असंही ते म्हणाले आहेत.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप केला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत इलेक्टोरल बॉन्डचा मुद्दा अत्यंत प्रभावी ठरणार आहे. भाजपचा वाद हा विरोधी पक्षांशी नसून याच मुद्द्यावरून देशाच्या जनतेशी होणार आहे. कारण हाच विषय काळात सामान्य जनतेच्या मुखी होताना दिसत आहे आणि हळूहळू जनतेलाही हा घोटाळा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं कळून चुकेल. याच कारणाने या सरकारला मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा दावाही परकला प्रभाकर यांनी केला आहे.

अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर हे 2014 ते 18 या काळात आंध्र प्रदेशच्या सरकारी प्रशासन सेवेत होते. 1959 साली जन्मलेल्या प्रभाकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून पदवी घेतली असून त्यांन अर्थशास्त्र विषयातील काही पुस्तकांचं लेखनही केलं आहे.