पश्चिमरंग – हंगेरियन रॅप्सडीज

>> दुष्यंत पाटील

जिप्सी संगीताचा प्रचंड प्रभा व असणारा महान संगीतकार व पियानो वादक फ्रँझ लीस्ट. त्यानेपियानोसाठी कित्येक रचना केल्या. लीस्टने जिप्सी लोकांच्या संगीतापासून प्रेरणा घेत रचलेल्या हंगेरियन रॅप्सडीज प्रचंड गाजल्या. जवळपास पावणेदोनशे वर्षं लोटली असली तरी आजही या संगीत रचना तितक्याच लोकप्रिय आहेत.

एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये राष्ट्रवादाचे वारे वाहत होते. प्रत्येकाला आपापली सांस्कृतिक ओळख महत्त्वाची वाटत होती. यात हंगेरीचाही समावेश होता. या काळात हंगेरी ऑस्ट्रियन साम्राज्यामध्ये येत होते.

हंगेरियन लोकांची स्वतची अशी एक वेगळी संस्कृती होती. त्यांची भाषा ही वेगळी होती. ऑस्ट्रियन साम्राज्यामध्ये फक्त जर्मन आणि लॅटीन या भाषाच अधिकृत होत्या. हंगेरियन राष्ट्रवादी मंडळी हंगेरियन भाषा पुढे आणण्याचा प्रयत्न करत होती. यासाठी हंगेरियन भाषेतलं नवनवीन साहित्य येऊ लागलं. हंगेरीमधल्या लोककथा, पारंपरिक नृत्य यांना महत्त्व येऊ लागलं. या सगळ्यात हंगेरीचं परंपरिक संगीत मागे राहिलं असतं तरच नवल. मोठमोठ्या संगीतकारांनी हंगेरीचे पारंपरि क संगी त पुढे आणा यला सुरुवा त केली. या काळात हंगेरीचे पारंपरिक संगीत आणि तिथल्या जिप्सी (हंगेरीमधील भटकी जमात) लोकांचे संगीत एकमेकांत पूर्णपणे मिसळून गेलं होतं.

गंमत म्हणजे या जिप्सी लोकांचे एक प्रकारे हिंदुस्थानशी संबंध आहेत. जिप्सी लोक म्हणजे मूळचे हिंदुस्थानी. या लोकांनी आपला देश नेमका कधी सोडला याबाबत मात्र विद्वान मंडळींमध्ये एकमत दिसत नाही. सहाव्या शतकाच्या नंतर आणि बाराव्या शतकाच्या आधी कधी तरी हे लोक हिंदुस्थान (राजस्थान आणि उत्तर हिंदुस्थानातील भाग) सोडून मध्यपूर्वेकडे गेले असं मानण्यात येतं. या लोकांनी प्रवास करता करता प्रत्येक ठिकाणाचे संगीत, भाषा आत्मसात केल्या. नंतर हे लोक युरोपमध्ये गेले.

जिप्सी लोक जिथे जायचे, तिथलं संगीत आत्मसात करायचे. आपली सर्जनशीलता वापरत समृद्ध करून सादर करायचे. एकोणिसाव्या शतकात जिप्सी लोक हंगेरीमध्ये कॅफे, रेस्टॉरंट्स अशा ठिकाणी, तसंच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये संगीत सादर करताना दिसायचे. जिप्सी संगीतात व्हायोलिन, गिटार, अ‍ॅकॉर्डियर्डिन अशी पारंपरिक वाद्यं वापरली जायची. संतूरसा रखे ‘सिम्बलोम’ नावाचं एक वाद्यही हे जिप्सी लोक वापरायचे. ताल देण्यासाठी वेगवेगळी तालवाद्यंही असायची.
प्रेमगीतांपासून ते नृत्यसंगीतापर्यंत कसलंही संगीत जिप्सी लोकांना वर्ज्य नव्हतं. वाद्यावर असणारे प्रभुत्व दर्शवणा रे, वाजवायला कठीण असणारे संगीतही जिप्सी संगीतात यायचे. हंगेरीमध्ये जिप्सी लोकांनी पारंपरिक हंगेरियन संगीत अशा प्रकारे आत्मसात केलं होतं की ज्या योगे हंगेरियन आणि जिप्सी संगीत यांच्यातली सीमा रेषा धूसर झाली होती.

जिप्सी संगीताचा प्रचंड प्रभाव असणाऱ्या महान संगीतकारां पैकी एक संगीतकार होता फ्रँझ लीस्ट. आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्वात महान पियानो वादकांमध्ये लीस्टची गणना होते. एकाच वेळी महान संगीतकार आणि पियानो वादक असणाऱ्या लीस्टने पियानोसाठी कित्येक रचना केल्या. जिप्सी संगीतातून प्रेरणा घेणाऱ्या लीस्टच्या हातून संगीताच्या माध्यमातून हंगेरियन राष्ट्रवादपुढे नेण्याची कामगिरी घडणार होती.

लीस्टने जिप्सी लोकांच्या संगीतापासून प्रेरणा घेत हंगेरियन रॅप्सडीज रचल्या. रॅप्सडी मुक्त संगीतरचना, ज्यात व्याकरणाचे नियम पाळले जात नाहीत. आपण पूर्वी पाहिलेला म्युझिकल फॉर्मही यात नसतो. या संगीतरचनेत एकमेकांशी सुसंगती साधणार नाहीत असे वेगवेगळे भाग येतात. त्यामुळे एकाच रॅप्सडीमध्ये वेगवेगळे भाव किंवा मूड्स असणारे संगीत येते. रॅप्सडी मध्ये बऱ्याच थीम्स येतात.

लीस्टने एकूण 19 रॅप्सडीज रचल्या. या साऱ्या पियानोवर वाजवण्यासाठी केलेल्या रचना आहेत. या संगीतरचना करताना त्याने जिप्सी लोकांच्या संगीतात ऐकलेल्या थीम्सचा वापर केला. यातल्या बहुतेक सगळ्या थीम्स हंगेरियन पारंपरिक संगीतातल्या असल्या तरी काही थीम्स मात्र विशिष्ट संगीतकारांनी रचलेल्या होत्या. या रचना वाजवायला कठीण आहेत. आपल्या प्रतिभेने लीस्टने जिप्सी लोकांकडून ऐकलेले संगीत शास्त्रीय संगीताच्या पातळीवर नेले.

लीस्टच्या हंगेरियन रॅप्सडीज प्रचंडच गाजल्या. जवळपास पावणेदोनशे वर्षं लोटली असली तरी आजही या संगीतरचना तितक्याच लोकप्रिय आहेत. चित्रपट, टीव्हीवरचे कार्यक्रम अशा ठिकाणीही या रचना बऱ्याचदा वापरल्या गेल्या आहेत. या संगी तरचना पैकी क्रमांक 2 ही रचना विशेष लोकप्रिय आहे.

लीस्टच्या हंगेरियन रॅप्सडीज आजही इतक्या लोकप्रिय का असाव्यात हे पाहण्यासाठी आपण youtube Hungarian rhapsody no. 2 ही संगीतरचना एकदा तरी ऐकायलाच हवी.

[email protected]