बृजभूषणवरील लैंगिक आरोप; 18 एप्रिलला निक्काल लागणार  

 

 

महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप झालेले राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष आणि भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण शरण सिंह याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधातील आरोपांची निश्चिती करण्याबाबत दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने आपला निकाल 18 एप्रिलपर्यंत राखून ठेवला आहे.

ऑलिम्पिकपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह इतर काही महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणांची आरोप निश्चिती व्हावी यासाठी दिल्लीच्या स्थानिक कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे, तसेच 18 एप्रिल रोजी यावर निकाल देणार आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून यापूर्वी राऊस अव्हेन्यू कोर्टाने काही मुद्दय़ांवर स्पष्टीकरण मागवले होते.

बृजभूषण यांच्याविरुद्ध सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता, मात्र यानंतर या मुलीने आपला जबाब मागे घेतला होता. पण इतर कुस्तीपटूंच्या आरोपांवरून त्यांच्यावर कलम 354, कलम 354 अ आणि ड याअंतर्गत चार्जशीट दाखल केली होती. त्यामुळे 18 एप्रिलला होणाऱया निकालाकडे सर्वांच्या नजरा असतील.