गुरुवारी ठरणार महाविकास आघाडीसाठी रणनिती; संजय राऊतांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

राज्यात सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून अनेक सामजिक घटक महाविकास आघाडीसोबत येत आहेत. हुकूमशाहीविरोधात आणि संविधान रक्षणासाठी एकत्र येण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीसोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच मोदी-शहा यांची व्यापारी वृत्ती आणि भाजपच्या राजकारणावरही त्यांनी तोफ डागली.

निवडणूक जाहीर होण्याआधापासून आमच्या सभा सुरू आहेत. आता यापुढे महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा होणार आहेत. त्याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी गुरुवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. उमेदवारी यादीही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, त्यामुळे आमचे काम थांबलेले नाही. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेने सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यादृष्टीने सकारात्मक चर्चा झाल्या आहेत आणि होत आहेत. याबाबत दोन दिवसात निर्णय घेतले जातील, असे संजय राऊत म्हणाले.

सन्माननीय शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. आम्ही त्यांच्या इच्छेचा आदर करतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या त्यांची भेट घेणार आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या आम्ही सन्मान करतो. आमच्यात हुकूमशाहीविरोधात लढण्यासाठी एकवाक्यता आहे. आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांना दिला आहे. याबाबत महाविकास आघाडीत पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो. राजकारणात प्रस्तावावर चर्चा होत असतात, असे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केल्याने त्यांच्या संवेदना आणि भावना आणि खंत आपल्याला कळतात. त्यांनी मोदी-शहा देशाचे स्वातंत्र्य प्रजासत्ताक फासावर लटकवत आहेत, असे व्यंगचित्र काढले होते, ते आपल्याला खूप आवडले. त्यांनी त्यातून व्यक्त केलेल्या भावना देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आहेत. राज ठाकरे यांनी एका भाषणात पुलवामा घटनेचा उल्लेख केला होता. या हत्याकांडाआधी बँकॉकमध्ये हिंदुस्थानचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांची गुप्त भेट झाली होती, असे त्यांनी म्हटले होते. या भेटीनंतरच पुलवामा घटना घडली का, या त्यांच्या प्रश्नाचे अमित शहा यांनी उत्तर दिले असावे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

संभाजीनगरच्या जागेवरून कोणताही वाद नाही. निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणे चुकीचे नाही. कार्यकर्ते पक्षासाठी काम करत असतात. त्यामुळे त्या त्या स्तरावर निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा असते. शिवसेना ज्या जागा लञवत आहे, त्याठिकाणी एकापेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.त्यामुळे इच्छुकांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी सर्वजण पक्षासाठी काम करतात. संभाजीनगर आमचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा आम्हीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात कोणताही वाद नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत. दानवे यांच्याकडे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते हे महत्त्वाचे पद आहे. त्यातून ते सरकारला प्रश्न विचारत आहेत. जनतेचा आवाज उठवत आहेत, त्यामुळे आमच्यात कोणताही वाद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही भाजपसोबत 25 वर्षे होतो. 25 वर्षांनंतर एखादा पक्ष व्यक्त होतो, तेव्हा व्यक्तिगत कारणे नसतात, तर राज्य आणि देशहिताची कारणे असतात. आज मोदी यांचे भाजप, त्यांचे राजकारण, त्यांचे सरकार, त्यांची व्यापारी वृत्ती मुंबई आणि महाराष्ट्र लुटायची एकही संधी सोडत नाही, अशावेळी महाराष्ट्र अभिमानी माणूस त्यांच्यासोबत जाणार नाही. मराठी माणूस ,महाराष्ट्र आणि देशहितासाठी याआधीही अनेकांनी भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे 25 वर्षांनंतर शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेत राज्याचे आणि देशाचे हित आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.