अनोखी ‘चारण’ परंपरा उलगडली

चारण परंपरा ही वैदिक कालखंडातील आहे. पुराण आणि इतिहास, साहित्य आणि संगीत शतकानुशतके जपणारी ही परंपरा आहे. ही परंपरा उलगडणारा मुंबईतील पहिला चारण समागम कार्यक्रम नुकताच वर्ल्ड पह्रम फॉर आर्ट अॅण्ड कल्चरचे नृत्य शैक्षणिक प्रमुख असलेल्या सुनील सुंकारा यांच्या ‘नटरावी’ या संस्थेने आयोजित केला. यामध्ये चारण समाजातील विद्वान, तरुण कलावंत एकत्र आले.

या कार्यक्रमात चारण साहित्यावरील पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. चारणी साहित्याचे देशातील अभ्यासक, राजकोट येथील प्रा. अंबादान रोहाडिया यांनी श्रोत्यांना एक मंत्रमुग्ध करणारी चारणी गाथा सांगितली. जिथे त्यांनी चारणींना पेन आणि तलवार या दोन्हीत प्रावीण्य कसे प्राप्त झाले ते सांगितले. मुंबईचे भानुंजय धवड चारण यांनी या परंपरांशी जोडलेले गंधर्व नृत्य आणि संगीताचे पैलू मांडले, तर जयदीप पुंभानी यांनी त्यांच्या ‘शक्तिनु स्वरूप’ पुस्तकातून शक्तीच्या कथा मांडल्या. अमदवाद येथील संकेत साधू, युवा चारण संगीतकार आणि साहित्यकार यांनी सीता स्वयंवर आणि महाराणा प्रताप यांच्या कथांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

हा कार्यक्रम 31 जानेवारी रोजी डॉ. पियुष राज यांच्या नतनम स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि स्मृती तळपदे, पौलुमी मुखर्जी, शुभदा वराडकर यांच्या उपस्थितीत व एनसीपीए मुंबई डान्स सीझन 2024 च्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

कथ्थक – कवितांचे फ्युजन

कला मोक्ष मुंबई येथील अक्षोभ्य भारद्वाज चारण परंपरेतील नृत्य पैलू या विषयावर पीएचडी करत आहेत आणि त्यांनी चारण शिव तांडवासोबत कथ्थक कवितांचे अनोखे फ्युजन सादर केले. शीला मेहता यांनी कथ्थकमधील चारणी साहित्यावरील पैलू उलगडले.