एका हातात तुतारी दुसऱ्या हातात मशाल…; सुप्रिया सुळे यांचे दिल्लीच्या तख्ताला थेट आव्हान

‘आपली लढाई महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारा विरोधात आहे’, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुण्यात महाविकास आघाडीच्या सभेत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करत दिल्लीचे महाराष्ट्रातील षडयंत्र उधळून लावण्याचे आवाहन जनतेला केले.

‘आपलं चिन्ह गेलं. मात्र पक्ष बदलला म्हणून आम्ही चिन्ह बदललेलं नाही. आमचं चिन्ह का बदललं हे सर्वांना माहिती आहे. आपलं काय चुकलं? की आपलं चिन्हही गेलं आणि पक्षही गेला. कोणीतरी म्हटलं हे रडत बसतील. मी शारदाबाई पवार यांची नात आहे. माझ्या आजीने कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलं, मला लढायला शिकवलं आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही लढू’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Lok Sabha Election 2024 : सत्तेचा उन्माद काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवला; शरद पवार मोदी-शहांवर बरसले

‘माझ्या पांडुरंगाची इच्छा, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मला मिळालं. हे किती मोठे शुभ संकेत आहेत. लग्नकार्यात तुतारी वाजते, नवीन काही दुकानाचं, शॉपिंगचं ओपनिंग असलं की तुतारीवाला माणूसच तिथे असतो. मंदिरात प्राणप्रितिष्ठापना होते तिथेही तुतारीवाला माणूस असतो. महाराष्ट्र सरकारचं कुठलंही मोठं काम असलं की तुतारी वाजवणारा माणूसच असतो. त्यामुळे हे शुभ संकेत आहेत’, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हाही तुतारीच वाजली होती. त्यामुळे ही तुतारी आमचे बंधु रविंद्र धंगेकर यांच्या हातात द्यायची आहे’, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी शाहू, फुले, आंबेडर जितेगा धंगेकर… अशी घोषणा दिली. ‘शिवसेनेचे मी आभार मानते. एका हातात तुतारी आणि दुसऱ्या हातात मशाल आहे. महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्यासाठी दिल्लीतून जे षडयंत्र चाललंय त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपल्याला बारामती, शिरूर आणि पुण्यात करायचं आहे’, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

Lok Sabha Election 2024 : खोके सम्राट, पलटुसम्राट परवडत नाही, अमोल कोल्हेंची टीका

‘माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात’

‘आमच्या विरोधात 18 वर्षांत न बोलणारे आज आमच्याविरोधात वैयक्तिक टीका करत आहेत. मी आणि अमोलदादा कुणावरही अशी टीका करत नाही. ही निवडणूक आता महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने हातात घेतली आहे. लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि मला सांगतात मला धमकीचे फोन आले होते. पण सगळ्यांना मी सांगते जो तुम्हाला धमक्या देतो आहे ना त्याला फक्त माझा नंबर द्या’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘माझ्यावरही अमोल कोल्हेंसारखीच टीका केली जाते की, मी दहा वर्षांत केंद्रातला कुठलाच निधी आणला नाही. मी विनम्रपणे त्यांना सांगू इच्छिते की माझा मराठीत असलेला कार्यअहवाल तुम्ही वाचला नसेल. तो कार्यअहवाल मी सगळ्यांना पाठवणार आहे. माझा कार्यअहवाल जर तुम्ही वाचला तर जे सगळे टीका करणारे आहेत ते मलाच मतदान करतील याची मला गॅरंटी आहे. मी शब्द देते म्हणून गॅरंटी आहे, तसली गॅरंटी नाही. आम्ही त्यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन भाषण करणार नाही. माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे’, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.