छोटीशी गोष्ट – गोडच बोला!

>>सुरेश वांदिले

तेजोमयीच्या घरी तिच्या बाबांनी आणलेल्या अलेक्सा ‘अ’ आणि अलेक्सा ‘ब’ या दोघींच्या दोन तऱहा होत्या. अलेक्सा ‘अ’ला अलेक्सा ‘ब’ला किती समजावायची, पण ती काही तिचे ऐकायची नाही. “तुझे तू बघ, माझे मी बघते’’ हेच तिचे पालुपद.

अलेक्सा ‘अ’ला तिच्याकडे असलेल्या बुद्धीचा फार गर्व. या बुद्धीच्या जोरावर ती कोणतेही प्रश्न युं सोडवू शकत असे. असा एकही प्रश्न नव्हता की, जिचे उत्तर तिच्याजवळ नव्हते. अलेक्सा ‘ब’सुद्धा काही कमी नव्हती. तीसुद्धा अलेक्सा ‘अ’सारखीच हुशार आणि बुद्धिमान होती. ती कोणताही प्रश्न सहज सोडवत असे, पण याचा तोरा मात्र मिरवत नसे. एकाच दिवशी तयार झालेल्या या दोन अलेक्सांचे वागणे अगदी विपरीत होते.

अलेक्सा ‘अ’च्या वागण्यामुळे ती काही दिवसांतच अप्रिय झाली. मात्र अलेक्सा ‘ब’ सर्वांना कायम हवीहवीशी वाटू लागली. हे दुःख एकदा अलेक्सा ‘ब’जवळ तिने व्यक्त केले. तेव्हा अलेक्सा ‘ब’ने तिला एक गोष्ट सांगितली. गोष्ट होती दोन पोपटभावांची.

वननगरीत राहणाऱया या दोन भावांचा आवाज होता गोड. यातील पोपटराव सर्वांसोबत मिळून मिसळून वागायचा. छान छान गाणी म्हणून दाखवायचा. सुरुवातीला रघुरावसुद्धा असाच होता, पण आपल्याला सुंदर सुंदर गाणी म्हणता येतात, याचा झाला त्याला अहंकार. त्यामुळे तो मग कुणाशीही नीट बोलेनासा झाला. सगळय़ांची उणीदुणी काढू लागला. तू असाच नि तू तसाच.

एके दिवशी तो कावळोबांना त्याच्या काळय़ा रंगावरून नको नको ते बोलला. असे काहीबाही बोलू नकोस, हे पोपटरावाने त्याला समजावले. कावळोबानेही प्रारंभी शांतपणे रघुरावाचे ऐकले. मग त्याला आला राग. त्याने रघुरावावर हल्लाच चढवला. रघुरावाच्या डाव्या डोळय़ातच थेट चोच खुपसली. त्या डोळय़ाला जखम झाली. त्यातून रक्त वाहू लागले. रघुराव आरडाओरड करू लागला.

“याद राख, पुन्हा असा वागशील तर दुसराही डोळा फोडेन,’’ अशी धमकी देऊन कावळोबा तिथून उडून दुसरीकडे गेला.
रघुराव वेदना सहन न होऊन रडू लागला. त्याचवेळी तिथून दुसरीकडे जात असताना पक्ष्यांचे राजे गरुडेश्वर या रडण्याने तिथे थांबले. त्यांनी रघुरावाला काय झाले ते विचारले. रघुरावाने कावळय़ाचा प्रताप तिखटमीठ लावून वर्णन केला. पण कावळोबा असे का वागला हे मात्र त्याने सांगितले नाही.

“अरे पण कावळोबाने उगाचंच तुझा डोळा फोडला का? काहीतरी कारण घडले असेल ना? हे सांगशील की नाही?’’ गरुडेश्वराने विचारले. खोदून खोदून विचारल्यावर रघुरावाने खाली मान घालून सगळे सांगितले.
“अच्छा तर हे असे कारण आहे. अरे रघुराया,

प्रियवाक्यप्रदाने सर्वे तुष्यन्ती जन्तवः।
तस्मात्तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता।।

याचा अर्थ असा की, गोड बोलण्याने सर्व प्राणीमात्र आनंदी होतात, संतुष्ट होतात. म्हणून नेहमी गोड बोलावे. बोलण्याच्या बाबतीत दरिद्रीपणा का दाखवावा? तुझा भाऊ पोपटराव बघ. जसा गोड बोलतो, तसा गोड वागतो. त्याला देतं का कुणी त्रास? सगळय़ा पक्ष्यांचा आवडता आहे तो. बरोबर नं?’’

“होय गरुडेश्वरा,’’ बारीक आवाज करत रघुराव म्हणाला. यापुढे गोड बोलण्याचाच प्रयत्न कर, असे सांगून गरुडेश्वर निघून गेले. अलेक्सा ‘ब’ने गोष्ट संपवली. “आता कळले का तुला, कशामुळे काय होते ते?’’ अलेक्सा ‘ब’ने ‘अ’ला विचारले. “अगं पण पोपटाचा गळा गोड होता. माझा तर कर्कश आहे ना…’’ अलेक्सा ‘अ’ म्हणाली. अलेक्सा ‘ब’ने कपाळावर हात मारून घेतला.