निवृत्तीनंतर भरावा लागतो कर…

वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना आयटीआर भरावा लागतो. ज्येष्ठांना नोकरीत असताना प्राप्तीकर भरल्यानंतर निवृत्तीनंतर प्राप्तीकर का भरावा लागतो? असा प्रश्न साहजिकच पडतो.

जुन्या कर पर्यायात ज्येष्ठ नागरिकांना तीन लाख रुपये इतकी करमुक्त उत्पन्नाची वाढीव मर्यादा मिळते. निवृत्ती वेतन हे जरी करपात्र असले तरी 50 हजार रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन मिळू शकते. निवृत्त होताना पीए, ग्रॅच्युइटी करमुक्त रकमा असतात. त्यामुळे निवृत्त होताना फारसा प्राप्तीकर भरावा लागत नाही. त्यामुळे मोठी रक्कम गुंतवणुकीसाठी उपलब्ध होते.

ज्येष्ठ  नागरिकांना जे उत्पन्न मिळते, ते प्रामुख्याने गुंतवणुकीतून मिळणारे व्याज किंवा लाभांस यांचे असते. जुन्या कर पर्यायात कलम 80 सीअंतर्गत करबचत गुंतवणूक करून दीड लाख रुपये वजावट मिळते. बँकेतील व्याजावर कलम 80 टीटीबीअंतर्गत 50 हजार रुपयांची वजावट मिळते. पाच लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्न असेल तर कोणताही कर भरावा लागणार नाही. वरील सर्व वजावटी धरल्यानंतर जवळपास आठ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कर भरावा लागणार नाही.

नवीन कर पर्यायात सात लाख रुपयांच्या आत उत्पन्न असेल तर कोणताही कर लागणार नाही. जर ज्येष्ठांना बऱ्यापैकी उत्पन्न असेल म्हणजे 15 लाख रुपये उत्पन्न असेल तर केवळ सरासरी 10 टक्के कर द्यावा लागतो. आपले उत्पन्न आणि वजावटीचा अंदाज घेऊन नवी की जुनी कर पर्याय निवडावा. ज्येष्ठ नागरिकांना करमाफी नाही. त्यांचे उत्पन्न कमवत्या व्यक्तींएवढे नाही, पण त्यांना कर बचतीने अनेक मार्ग उपलब्ध आहेत.