‘त्या’ करदात्यांना मिळणार नोटीस

टीडीएस कापला, पण आयटीआर भरला नाही

करपात्र उत्पन्न असलेल्या ज्या नागरिकांनी अद्याप प्राप्तिकराचे विवरणपत्र भरलेले नाही, अशा सर्व करदात्यांना लवकरच नोटीस पाठवल्या जाणार आहेत. ज्यांचा टीडीएस कापला गेला आहे आणि अद्याप आयटीआर भरलेला नाही, अशा करदात्यांना ही नोटीस मिळेल.

टीडीएस कापला गेल्यानंतर त्या व्यक्तीने कापला गेलेला कर परत मिळावा म्हणून सरकारला वार्षिक उत्पन्न दाखवत आयटीआर भरून त्याद्वारे टीडीएसचा परतावा घेणे अपेक्षित असते. मात्र टीडीएस कापूनही परतावा न घेणाऱया करदात्यांना कारणे दाखवा नोटीस जाईल, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळचे  ( सीबीडीटी) अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली.

अशा करदात्यांची संख्या सुमारे दीड कोटी आहे. कापला गेलेला कर आणि परतावा मागितलेली रक्कम एकसमान नसल्याचे प्राप्तिकर विभागाला आढळून आले आहे. या माहितीत विसंगती दिसून येत आहे. अनेकदा आयटीआर भरताना काही माहिती भरायचे राहून जाते. अशा वेळी विवरणपत्र अद्ययावत करून प्राप्तिकर विभागाने 4600 कोटी रुपये गोळा केले आहेत.