मतांसाठी लबाड फिरतील तेव्हा विचारा, सांग शिवसेना कुणाची? दक्षिण मुंबईतील शाखांना उद्धव ठाकरे यांची भेट

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देणारे लबाड उद्या मते मागायला गल्ल्यांमध्ये फिरतील तेव्हा त्यांना ठामपणे विचारा… सांग शिवसेना कुणाची. नाहीतर तुमचे डिपॉझिटच जप्त करतो, असे जाहीर आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दक्षिण मुंबईकरांना केले. शिवसेनेची मशाल अन्याय जाळून टाकण्यासाठी पेटलीय तसा महाराष्ट्र हुकूमशाही जाळून टाकायला पेटला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कफ परेड आणि गिरगाव येथील शिवसेना शाखांना भेटी देऊन जनसंवाद साधला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप व मिंधेंचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

कफ परेडच्या आंबेडकर नगरातील शिवसेना शाखा क्रमांक 226 तसेच गिरगावातील शाखा क्रमांक 218 ला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली तेव्हा विभागातील नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच शिवसेनेच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी केलेली गर्दी पाहून जणू काही विजयाचा दौरा आहे असा भास होतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संत सेवालाल मंदिर उभारणार

कफ परेडमध्ये बंजारा समाजबांधवांची मोठी संख्या असल्याने तिथे संत सेवालाल यांचे मंदिर उभारावे असे निवेदन यावेळी नागिरकांनी उद्धव ठाकरे यांना दिले. त्यावर आपले सरकार येऊ दे, सेवालाल यांचे मंदिर झालेच म्हणून समजा, असे अभिवचन उद्धव ठाकरे यांनि दिले.

शिवसेना शाखा भेटींना एवढी गर्दी होत असेल तर मग सभांना किती होईल असे गिरगावमधील गर्दी पाहून उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र आता पेटलाय, शिवसेनेची मशाल अन्याय जाऊन टाकण्यासाठी पेटलीय तसा महाराष्ट्र हुकूमशाही जाळून टाकायला पेटला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मतदान करून स्वातंत्र्य टिकवा

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या भीतीने घाबरून लोकं भाजपमध्ये जात आहेत. काल आपल्या घरातलेच घाबरून पळाले, असे उद्धव ठाकरे रवींद्र वायकर यांचा नामोल्लेख न करता म्हणाले. स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य दिले, आता आपल्याला मतदान करून ते स्वातंत्र्य टिकवायचेय, असे आवाहन त्यांनी केले.

हुकूमशहाचा अस्त करा

हुकूमशाहीचे संकट आपल्या उंब्रयावर आहे, कोरोनासाठी दार बंद केले होते तसे हुकूमशाहीसाठी आपल्याला बंद करावे लागेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपच्या हुकूमशाहीवर प्रहार केला. हुकूमशहा कितीही मोठा असला तरी जनतेच्या रेटयासमोर छाती पुढे काढून चालू शकत नाही, असे सांगतानाच, त्या हुकूमशहाचा उदय होण्यापूर्वी अस्त करा, असा संदेशही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

राहुल नार्वेकर म्हणजे…मला नाही आब्रू, मी कशाला घाबरू

दक्षिण मुंबई मतदारसंघातून राहुल नार्वेकर हे भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाडोत्री जनता पक्ष राहुल नार्वेकर यांना इथून उभे करतोय असे ऐकायला येतेय. इथेही ते आपल्याविरुध्द लढणार आहेत. सुप्रीम कोर्टाने कानफाड फोडले तरी त्यांना लाज ना लज्जा. म्हणतात ना…मला नाही आब्रू, मी कशाला घाबरू. नार्वेकरांना आब्रूच नाही. चार पक्ष फिरून आलेत तरीही फिरताहेत. पण आता इतके बदनाम झालेत की कुणीही घेणार नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

अरविद सावंत यांची उमेदवारी जाहीर

हॅटट्रिक होऊ द्या, असे सांगत याकेळी उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविद सावंत यांची उमेदवारी जाहीर केली. लबाडाला माझे आव्हान आहे. तुझी असेल नसेल ती ताकद लाव आणि माझ्या या कट्टर शिकसैनिकासमोर उभा राहूनच दाखव, तुझे डिपॉझिट जप्त करणारच, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांना दिला.

उद्धव ठाकरे हुकूमशाहीविरुद्ध सह्याद्रीसारखे उभे ठाकले आहेत – अरविंद सावंत

देशात ज्या वाईट पध्दतीने राजकारण सुरू आहे त्या परिस्थितीत एकच माणूस मोदी शहांना आवाज देतो, भिडतोय ते म्हणजे उद्धव ठाकरे, असे सांगतानाच, महाराष्ट्राचा धर्माभिमान घेऊन उद्धव ठाकरे सह्याद्रीसारखे हुकूमशाहीविरुध्द उभे ठाकले आहेत, असे प्रशंसोद्गार यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी काढले.

अरविंद सावंत यांनी यावेळी आपण खासदार या नात्याने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामांचा दाखला यावेळी दिला. कफ परेडमध्ये लागलेल्या आगीमध्ये 450 घरे जळून खाक झाली होती. त्या नागरिकांचा संसार शिवसैनिकांनी पुन्हा उभा करून दिला. पीएम आवास योजनेतून या नागरिकांना पक्की घरे मिलाली नाहीत पण शिवसेनेने म्हाडाच्या माध्यमातून त्यांना घरे बांधून दिली असे अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितले.

या शिवसेना शाखा भेटींच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सौ. रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. तसेच उपनेते राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, माजी आमदार अरविंद नेरकर, सुधीर साळवी, शाखाप्रमुख बाळा अहिरेकर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली तसेच गिरगावच्या शिवसैनिकांनी त्यांना गणपतीची मूर्ती भेट दिली.