खाऊच्या गोष्टी – चला हुरडा पार्टीला

>>रश्मी वारंग

जानेवारी, फेब्रुवारी महिना म्हणजे खाऊगिरीसाठी आदर्श महिना. संक्रांत सरली की, खवय्यांना हुरडय़ाचे वेध लागतात. एकेकाळी शेतकऱयांच्या कुटुंब आणि मित्रपरिवारापुरता मर्यादित असणारा हुरडा सध्या शहरी मंडळींसाठी आकर्षण ङ्खरू लागला आहे. या हुरडय़ाची ही दाणेदार गोष्ट.

हुरडा म्हणजे नेमके काय हे माहीत नसणाऱयांसाठी हुरडा म्हणजे कोवळय़ा कणसातून काढलेले दाणे. ज्वारी हे एकेकाळी महाराष्ट्रातील नंबर वन पीक होते. जसजसे शेतकरी ऊस आणि सोयाबीन लागवडीकडे वळले तसे ज्वारीचे महत्त्व कमी होत गेले. अशा काळात हुरडय़ामुळे पुन्हा एकदा या धान्याकडे लक्ष वेधले. मात्र खाण्यासाठी वापरली जाणारी शाळू जवार वेगळी आणि हुरडय़ाची ज्वारी वेगळी. महाराष्ट्रातील सोलापूर, छत्रपती संभाजीनगर भागांत खास हुरडा स्पेशल ज्वारी पिकते. त्यातही सुरती, मालदांडी, दगडी आणि गुळभेंडी या जाती हुरडय़ासाठी खास ठरतात. सुरती हुरडय़ाचे दाणे तर इतके मऊशार की, नुसते हातावर घेऊन मळले तरी अख्ख्या कणसातले दाणे एका झटक्यात हातात यावेत. अशा या हुरडय़ाची ऑगस्टपासून लागवड सुरू होते. तयार ज्वारीला फारसा चांगला भाव मिळत नसताना हुरडा 200 ते 300 रुपये प्रति किलो दराने विकला जातो. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी हुरडा लागवडीकडे वळू लागले आहेत.

हुरडय़ाच्या चवीची मोहिनी अशी की पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर भागांत हुरडा पार्टी आयोजित होत आहेत. अनेक जण शेतावर शेकोटी आणि गरमागरम हुरडा पार्टी ठेवतात. पूर्वी हुरडा तयार झाला की सगेसोयरे, मित्रपरिवार यांच्यासोबत मेजवानी व्हायची. आता त्याचेच व्यावसायिक रूप म्हणजे हुरडा पार्टी. मात्र इथे फक्त हुरडा नाही तर खास शेतावर खावे असे अनेक पदार्थ हुरडय़ासोबत मिळतात. तिखट-आंबट-गोड चटण्या, तिळाच्या रेवडय़ा, दही, वांग्याचे भरीत आणि भाकरी हुरडय़ासोबत बहार आणतात.

याशिवाय हुरडय़ापासून बनवलेले कटलेट, भेळ, वडे या नव्या खाद्यप्रयोगांचाही विसर पडून चालणार नाही. या सगळय़ा नव्या प्रयोगांमुळे बळीराजाला उत्पन्नाचा नवा मार्ग उपलब्ध झाला आहे आणि तो सुखावणारा आहे. हिंदुस्थानी खाद्यपदार्थ नेहमीच निसर्ग चक्र आणि शेती संस्कृतीशी नाते सांगतात. जोंधळय़ाच्या पातीत तुंडुब रसानं भरलेल्या हिरवापंच हुरडय़ाचा घास म्हणूनच मातीशी इमान राखणारा ङ्खरतो.

ग्रामीण संस्कृतीशी नाळ

एकेकाळी मराठा मावळय़ांच्या चपळाईचे वर्णन करताना हातावर भाकर चटणी खाणारा, हुरडा तोंडात कोंबून कूच करणारा चित्त्याच्या चपळाईचा सैनिक असे वर्णन केले जाई. धावत्या, पळत्या युद्धकाळात मराठा मावळय़ांची खाण्याची सोय करणारा हुरडा, शेतावरच्या मैफलीत रंगत भरणारा हुरडा ते शहरी जीवनात रमलेल्या मंडळींना गावाकडे खेचून नेत ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडणारा हुरडा असा बदल आपल्याला दिसतो.