काँग्रेस स्थापना दिनानिमित्त नगर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते नागपूरला जाणार

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने 138 व्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे होत असलेल्या सभेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातून दहा हजार कार्यकर्ते जाणार आहेत.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे नगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने नागपूर सभेसाठी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धीरज गुजर म्हणाले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्याची वाटचाल अतिशय चांगली आहे. ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते असलेले विखे यांनी पक्ष सोडला, त्या परिस्थितीत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाची धुरा अत्यंत सक्षमपणे संभाळली. काँग्रेस पक्षाला सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणून ठेवले तसेच 44 आमदार ही निवडून आणले.

आमदार कानडे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते आज नागपूरला रवाना होणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये आमदार थोरात यांनी कायमच पक्षाला बळ देण्याचे काम केले आहे. पुढील काळामध्ये महाविकास आघाडीला चांगले दिवस येणार असल्याचेही ते म्हणाले.