अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया; मुंबईसह 5 विभागांतील 455 कॉलेजमध्ये शून्य प्रवेश

वर्ष 2023-24 मध्ये मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती विभागात पार पडलेल्या अकरावी ऑनलाईन आणि कोटय़ातील प्रवेश प्रक्रियेद्वारे केवळ 70 टक्के प्रवेशच झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. यात 100 टक्के प्रवेश झालेल्या विभाग आणि माध्यमांचे प्रमाण 10 टक्केदेखील नाही. ऑनलाईन प्रवेश राबविलेल्या पाच विभागांतील 455 कॉलेजमध्ये शून्य प्रवेश झाले आहेत.

पुणे येथील सिस्कॉम संघटनेने माहिती अधिकारातून मिळालेल्या माहिती आधारे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेलच याची खात्री देता येणार नाही, असा आरोप केला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार वर्ष 2023-24 मध्ये झालेल्या अकरावी प्रवेशात एकूण क्षमतेच्या 70 टक़्केदेखील प्रवेश झालेले नाहीत, असा दावा सिस्कॉमच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी केला आहे.

अकरावी प्रवेशासाठी अमरावती 16,190, मुंबई 389,675, नागपूर 54,650, नाशिक 27,360 आणि पुणे 1,17,990 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी अनुक्रमे अमरावती विभागात 10 हजार 551, मुंबई 267,862, नागपूर 32, 564, नाशिक 17,983, पुणे 78,130 जागांवरच प्रवेश झाले आहेत.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी

  • विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल याची खात्री नाही.
  • ही प्रक्रिया ऑनलाईन नसून गुणवत्ता याद्या केवळ ऑनलाईन अपलोड केल्या जातात.
  • वर्ष 2019 नंतर प्रवेशाचे लेखापरीक्षण झालेले नाही.
  • इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोटय़ातील प्रवेश नियमित प्रवेश फेरीच्या 15 दिवस आधी पूर्ण होणे आवश्यक आहे, मात्र तसे होताना दिसत नाही.
  • शून्य फेरीपासून नियमित फेरीच्या अंतिम टप्प्यापर्यंत कोटय़ातील प्रवेश सुरू असतात.