अमेरिकन नौदलाच्या खलाशांना गद्दारीच्या आरोपाखाली अटक; चीनला पुरविली गोपनीय माहिती..

विश्वासघाताच्या घटना या फक्त आपल्याच देशात घडत नाहीत तर अमेरिकेतही विश्वासघात.. भ्रष्टाचार.. लाचलुचपत या साऱ्यांना तोंड द्यावे लागते. दोन अमेरिकन नौदलाच्या खलाशांना चीनला गुप्त माहिती पुरविण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांनी संवेदनशील राष्ट्रीय सुरक्षा सामग्री चीनला पुरविली आहे असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

26 वर्षीय नौदल अधिकारी वेनहेंग झाओ यांच्यावर यूएस सैन्याच्या संवेदनशील माहितीची छायाचित्रे आणि चित्रफितींच्या  बदल्यात सुमारे 15,000 डॉलर्स लाच घेतल्याचा आरोप आहे. दुसरे खलाशी जिनचाओ वेई यांच्यावर हजारो डॉलर्सच्या बदल्यात राष्ट्रीय संरक्षण माहिती चीनला पाठवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. सहाय्यक ऍटर्नी जनरल मॅट ओल्सेन यांनी सॅन दिएगो येथे पत्रकारांना सांगितले की, खलाशांच्या या विश्वासघातकी  कृतीमुळे, “संवेदनशील लष्करी माहिती पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या हाती गेली.” झाओवर इंडो-पॅसिफिक प्रदेशातील अमेरिकी लष्करी सराव योजना, ओकिनावा, जपानमधील यूएस लष्करी तळावरील रडार प्रणालीसाठी इलेक्ट्रिकल डायग्राम, ब्लूप्रिंट आणि व्हेंचुरा काउंटी, सॅन क्लेमेंटे येथील यूएस नौदल सुविधांसाठीचा  सुरक्षा तपशील पाठवल्याचा आरोप आहे.

वेईवर यूएसएस एसेक्स, एक आक्रमण जहाज, एसेक्सची शस्त्रे, शक्ती संरचना आणि ऑपरेशन्स मांडणाऱ्या डझनभर तांत्रिक मॅन्युअल्ससह इतर अमेरिकन युद्धनौकांविषयी माहिती उघड केल्याचा आरोप आहे. गुरुवारच्या  पत्रकार परिषदेत अमेरिकन अधिकाऱ्यांनी चीनच्या हेरगिरी मोहिमेचा निषेध केला.

राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यापाराच्या अनेक मुद्द्यांवरून अमेरिका-चीन संबंध अनेक वर्षांपासून तणावपूर्ण आहेत. युनायटेड स्टेट्सने चीनवर हेरगिरी आणि सायबर हल्ल्याचा आरोप केला आहे, हा आरोप बीजिंगने फेटाळला आहे. चीननेही आपल्याला हेरांपासून धोका असल्याचे जाहीर केले आहे