‘बेस्ट’च्या गारेगार प्रवासात एकवीस हजारांवर ‘फुकटे’! पाच महिन्यांत 13 लाखांचा दंड वसूल

 ‘बेस्ट’च्या बसमध्ये अवघ्या सहा रुपयांपासून प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक गाडीमधून गारेगार प्रवास मिळत असताना हजारो फुकटय़ांकडून तिकीट न काढता प्रवास सुरू असल्याचे समोर आले आहे. यामध्ये गेल्या पाच महिन्यांत 20 हजार 986 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 13 लाख 4 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईकरांना दर्जेदार, आरादायी आणि गारेगार सुखकर प्रवासी सेवा देण्यासाठी ‘बेस्ट’कडून इलेक्ट्रिक बस चालवण्यात येत आहेत. या गाडय़ांचे तिकीटही माफक ठेवण्यात आले आहे. असे असताना अनेकजण या गाडय़ांमधून फुकट प्रवास करीत असल्याचे समोर आले आहे. ‘बेस्ट’मध्ये पहिल्या पाच किलोमीटरसाठी साध्या बससाठी 5 रुपये व वातानुकूलित बसेससाठी 6 रुपये तिकीट आकारले जाते, मात्र फुकटय़ांकडून बेस्टची फसवणूक सुरूच आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱया प्रवाशांविरुद्ध, खरेदी केलेल्या तिकिटाने प्रमाणित केलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱया प्रवाशांविरुद्ध उघडण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जानेवारी ते मे 2023 या 5 महिन्यांच्या कालावधीत एकूण 20, 986 प्रवासी विनातिकीट आढळले असून त्यांच्याकडून 13 लाख 4 हजार एवढी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली आहे.