विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणार वेळेवर, महापालिका खरेदीसाठी करणार 255 कोटींचा खर्च

महापालिका विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतरही शालेय वस्तू वेळेवर मिळत नसल्याने शिक्षण विभागाला लक्ष्य केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे यासाठी शिक्षण विभाग एक वर्षआधीच शालेय साहित्याची खरेदी करणार आहे. शिक्षण विभागाने 2024-2025 या शैक्षणिक वर्षांसाठी शालेय वस्तू खरेदीचा निर्णय घेतला असून यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याच्या खरेदीवर सुमारे 255 कोटी 29 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आठ मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये येणारे विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना 27 मोफत शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. मोफत बेस्ट बसची सुविधा, व्हर्च्युअल क्लास, अशा सुविधा उपलब्ध करण्यात येतात, परंतु शालेय वस्तू वाटपात दरवर्षी उशीर होतो आणि जून महिन्यात शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तू वेळेवर उपलब्ध होत नाहीत. दरवर्षी होणारी टीका लक्षात घेऊन पुढील शैक्षणिक वर्षासाठी लागणाऱया शालेय वस्तूंची खरेदी एक वर्षआधीच केली जाणार आहे.

असा होणार खर्च

गणवेश       131 कोटी 82 लाख रुपये

वह्या          33 कोटी 82 लाख रुपये

दप्तर          48 कोटी 87 लाख रुपये

छत्री व रेनकोट   15 कोटी 58 लाख

स्टेशनरी      25 कोटी 20 लाख रुपये

एकूण          255 कोटी 29 लाख