मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सहा वर्षांत 543 जणांचा मृत्यू

‘वेगाची नशा करी जीवनाची दुर्दशा’ या महामार्गावरील फलकाकडे दुर्लक्ष करीत वेगावर स्वार होण्याच्या नशेमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मागील सहा वर्षांत तब्बल 543 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. यातील बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचे पाहाणीअंती स्पष्ट झाले आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची आकडेवारी व कारणमिमांसा तयार केली जाते. त्यातील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मागील आकडेवारी पुढे आली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची एकूण लांबी 94. 600 कि.मी. आहे. या द्रुतगती मार्गाची देखभाल, दुरुस्ती व टोल गोळा करण्याचे काम आर.आर.बी. एमपीईएल पंपनीला 1 मार्च 2020 ते 30 एप्रिल 2030 या काळासाठी दिले आहे. या महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी उपाय योजण्यात येतात. पण तरीही अपघात सुरूच असतात. त्यामुळे अपघातांची कारणमिमांसा करण्यात आली.