सीबीआयच्या डीएसपीला सायबर भामटय़ांचा गंडा; दोन लाखांची फसवणूक

दिल्ली क्राईम ब्रँचमधून बोलतोय, तुमच्या नावाने एक पार्सल आले असून त्यात ड्रग्ज व काही  आक्षेपार्ह साहित्य आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई होईल असे धमकावत सायबर भामटय़ाने सीबीआयच्या डीएसपीला गंडा घातला. विविध पद्धतीने घाबरवत आरोपींनी त्या अधिकाऱयाची आरबीआय व्हेरिफिकेशच्या नावाखाली दोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय खुल्लर (59) असे फसवणूक झालेल्या अधिकाऱयाचे नाव आहे. खुल्लर हे बीकेसी येथील सीबीआयच्या ईओबीमध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. खुल्लर कार्यालयात असताना त्यांना एका क्रमांकावर फान आला व समोरच्याने तो आशीष शर्मा बोलत असून तो दिल्ली गुन्हे शाखेचा डेप्युटी सेफ्टी ऑफिसर असल्याची ओळख सांगितली. त्या भामटय़ाने त्याचा आयडी क्रमांक तसेच खुल्लर यांचा आधारकार्ड नंबर सांगितला तेव्हा त्याने सांगितलेला आधार नंबर आपलाच असल्याची खातरजमा खुल्लर यांनी केली. त्यानंतर दिल्लीच्या आयजीआयजीआय विमानतळावर दिल्ली-कंम्बोडिया विमानाने तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे. त्यात आठ पासपोर्ट, पाच बँक डेबिटकार्ड, 170 ग्रॅम एमडी, चार किलो क्लॉज, 45 हजार रुपयांची रोकड असल्याचे त्याने खुल्लर यांना सांगितले. त्यावर माझे कुठलेही पार्सल आले नसल्याचे खुल्लर यांनी सांगितले. त्यानंतर खुल्लर यांच्या व्हॉट्सऍपवर एका नंबरवर हॅलो दिल्ली क्राईम ब्रँच असा संदेश आला. मग दुसऱया क्रमांकावरून खुल्लर यांना व्हॉट्सऍप कॉल आला आणि मनी लॉण्डरिंगच्या गुह्यात पकडणार असल्याचे घाबरवले.

आरबीआय व्हेरिफिकेशनच्या बहाण्याने…

धमकी व घाबरविण्याचे काम केल्यानंतर त्या भामटय़ाने या प्रकरणात आरबीआय व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असल्याचे खुल्लर यांना सांगितले. त्यासाठी दोन लाखांची मागणी करण्यात आली. व्हेरिफिकेशननंतर तुमचे पैसे परत केले जातील असेही सांगण्यात आले. खुल्लर यांनी त्याप्रमाणे दोन लाख रुपये ऑनलाइन पाठवले. त्यानंतर आठवडा होत आला तरी पैसे परत न आल्याने खुल्लर यांना आपली सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अज्ञात सायबर भामटय़ांविरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस गुह्याचा तपास करीत आहेत.