अभिनेता, दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचे निधन

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचे रविवारी निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. झारापकर यांच्यावर शुक्रवारपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कर्करोगामुळे मल्टिपल ऑर्गन फेल्युअरने त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत झारापकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

क्षितीज झारापकर यांनी अभिनेता म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ते लेखन, दिग्दर्शनाकडे वळले. त्यांनी मराठी नाटकांचे समीक्षण केले. झारापकर यांनी मराठी चित्रपटांत अभिनयाचा ठसा उमटवला. गोळाबेरीज, बालगंधर्व, आयडियाची कल्पना, ठेंगा अशा अनेक चित्रपटांत काम केले. एकुलती एक, आयडियाची कल्पना, धुरंधर भाटवडेकर अशा अनेक चित्रपटांचे पटकथा लेखन, दिग्दर्शन केले. टुरटुर, काळा वजीर पांढरा राजा, सुंदरा मनामध्ये भरली, दांडेकरांचा सल्ला, विच्छा माझी पुरी करा, लाखात मी देखणी आदी नाटकांमध्ये काम केले. दामिनी, आभाळमाया, घरकुल, छत्रपती शिवाजी, स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, घडलंय बिघडलंय या मालिकांमध्ये झारापकर यांनी अभिनय केला.