संभाजी भिडे यांच्या चिपळूण दौऱ्याला विरोध, कार्यक्रमाला परवानगी न देण्याची मागणी

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राजाराम मोहन रॉय, महात्मा जोतिबा फुले आदी महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करणाऱया  संभाजी भिडेंच्या चिपळूण दौऱ्याला विरोध होऊ लागला आहे. इथल्या 8 संघटनांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. भिडे यांचा 3 ऑगस्ट रोजी चिपळूण दौरा असून या दौऱ्यादरम्यान त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्या राज्यातील विविध भागात होणाऱ्या कार्यक्रमांना विरोध होऊ लागला असून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसतर्फे यापूर्वीच विधानसभेत करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरात कार्यक्रमाला परवानगी नाकारली

महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करणाऱया  संभाजी भिडेंच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी अमरावती येथे बोलताना महात्मा गांधी यांच्याविषयी हीन वक्तव्य केले. त्यानंतर यवतमाळ येथे पंडित नेहरूंविषयी वादग्रस्त विधान केले. वाशीम येथे राजाराम मोहन रॉय, महात्मा जोतिबा फुले यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. संभाजी भिडेंच्या वक्तव्यांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहे.

शिव प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजीनगर येथील शाखेच्या वतीने अग्रेसन भवनात संभाजी भिडेंचे व्याख्यान ठेवण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने शुभम कदम यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली, मात्र अनेक संस्था, संघटनांनी भिडेंच्या कार्यक्रमाला विरोध केला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी या व्याख्यानाला परवानगी नाकारली.

ही सरकारचीच इच्छा

महापुरुषांवर टीका व्हावी, असे सरकारलाच वाटते. त्यामुळेच संभाजी भिडेंसारख्यांची हिंमत वाढत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. हिंमत असेल तर सरकारने भिडेंवर विनाविलंब कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी जालना येथे केली.

पोलिसांना घाबरून भिडे पळाले

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय आदी महापुरुषांच्या बदनामीची सुपारी घेतलेले संभाजी भिडे रात्रीच्या अंधारात छत्रपती संभाजीनगरात आले. पोलिसांनी त्यांना बंदी हुकूम बजावल्यानंतर बोऱयाबिस्तर गुंडाळून अंधारातच नगरकडे पळाले.गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांची बदनामी करण्याची सुपारीच शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी घेतली आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय आदींबाबत त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली.

ठाण्यातही संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल

महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह अनेक थोर पुरुषांबाबत वादग्रस्त विधाने करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावतीपाठोपाठ ठाण्यातही गुन्हा नोंदवण्यात आल्याने भिडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच असल्याने सर्वत्र त्यांचा निषेध केला जात आहे. ठाणे, कल्याणसह विविध ठिकाणी आज भिडे यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला. दरम्यान  केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी उल्हासनगरात पत्रकारांशी बोलताना भिडे यांच्यावर टीका केली. महात्मा गांधी यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे त्यांच्या वयाला शोभत नाही असेही आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले.