
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने सोशल मीडियावर धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. आमिर खानने गौरी स्प्रॅटसोबत केलेल्या तिसऱ्या लग्नावरून त्याला लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट आणि ऑडिओ संदेशांच्या सत्यतेची कोणत्याही अधिकृत यंत्रणेने पुष्टी केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने अर्झू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट आणि ऑडिओ संदेश प्रसारित केल्याचा दावा आहे. या पोस्टमध्ये आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाचा उल्लेख करत त्यावर ‘लव्ह जिहाद’चा आरोप करण्यात आला असून, अभिनेत्याला धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.
व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये, “जय श्रीराम, जय सीताराम. आम्ही अर्झू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोई ग्रुप) आमिर खानसारख्या लोकांकडून संस्कृतीविरोधी गोष्टींचा प्रचार सहन करणार नाही. अशा प्रकारांना लवकरच सडेतोड उत्तर दिले जाईल,” असा मजकूर असल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि, या पोस्ट आणि ऑडिओ संदेशांची सत्यता स्वतंत्रपणे पडताळली गेलेली नाही. संबंधित यंत्रणांकडूनही याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
दरम्यान, सलमान खाननंतर आता आमिर खानलाही लॉरेन्स बिश्नोई टोळीचे लक्ष्य बनवल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. मात्र, या दाव्यांबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसल्याने त्याकडे सावधगिरीने पाहण्याची गरज आहे.
दरम्यान, आमिर खानने नुकतेच त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत खासगी समारंभात नोंदणीकृत विवाह केला. या विवाहानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काही संघटनांनी या विवाहावर आक्षेप घेत ‘लव्ह जिहाद’चा आरोप केला होता. या वादावर प्रतिक्रिया देताना आमिर खानने एका मुलाखतीत स्पष्ट केले की, गौरी स्प्रॅटने धर्मांतर केलेले नाही. ती ख्रिश्चन असून, त्यांच्या नात्याचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्याने सांगितले. तसेच, त्याच्या माजी पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांनीही इस्लाम धर्म स्वीकारलेला नसल्याचे त्याने स्पष्ट केले.


























































