हीच शांता आता दुर्गेचे रूप घेईल! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

महिलांचा हा आक्रोश जर सरकारने ऐकला नाही तर महिलांमधील हीच शांता आता ‘दुर्गेचं’ रूप घेईल आणि समाजातील विकृती मनोवृत्तींना धडा शिकवेल, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महिलांचे रक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला दिला. महाराष्ट्रासह देशात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मणिपूर हिंसाचारात महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. त्यानंतरही केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. याबाबत देशभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. महिला अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारच्या निषेधार्थ  शिवसेनेच्या रणरागिणी आज रस्त्यावर उतरल्या. यावर आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या व सरकारला खडे बोल सुनावले.

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबईत गांधी पुतळ्याजवळ तोंडावर काळ्या पट्टया बांधून मुक आंदोलन करण्यात आले. यांच्या राज्यात महिलांचा सन्मान नाही, जनतेच्या मनात त्यांना स्थान नाही. इथे रोज होते द्रोपदीचे वस्त्रहरण, सोमया राठोड ब्रुजभुषण सत्तेतच बसले आहेत दुर्योधन, नारी का अपमान अब नही सहेगा हिंदुस्थान, अशा घोषणा लिहलेले फलक यावेळी फडकविण्यात आले.

युवती सेनेच्या वतीने या मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेना कोअर टीम सदस्य सुप्रदा फातर्पेकर, शितल देवरुखकर, राजूल पाटील, धनश्री कोळगे यांच्यासह रेणुका विचारे, अश्विनी पवार, धनश्री विचारे, प्रियांका जोशी, गीता कदम, गीता झगडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह युवसेना युवती सेनेच्या सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार वैभव नाईक, राजन साळवी, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेक, संजय पोतनीस, कैलास पाटील, उदयसिंग राजपूत, सचिन अहिर यांच्यासह विशाखा राऊत, ज्योती ठाकरे, संजना घाडी, श्रद्धा जाधव, पद्मावती शिंदे, युगंधरा सालेकर, प्रज्ञा सकपाळ, पवन जाधव, साईनाथ दुर्गे, अंकित प्रभू आणि शिवसेना महिला नगरसेविकांनी भेट दिली. विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी या आंदोलनाच्यावेळी स्थानिक नियोजन केले.