Lok Sabha Election 2024 : देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेत, आदित्य ठाकरे यांचा विश्वास

देशात सर्व राज्यांमध्ये भाजपविरोधी वातावरण आहे. हे चारशे पारचा नारा देत असले तर अनेक राज्यातून भाजपला विरोध आहे. त्यांना 200 पार करायलाही अडवलं जात आहे. देशात सध्या परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे आणि केंद्रात इंडिया आघाडीचेच सरकार येणार, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. गोरेगाव येथील आझाद मैदाने येथे आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी हा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी भाजप व मिंधे गटावर सडकून टीका केली.

”आपली ही लढाई फार मोठी नाही. ही लढाई तुमच्या भविष्याबद्दल आहे. म्हणूनच आपल्या संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. ही लढाई आधीच ठरलेली असती तर ही लढाई झालीच नसती. या देशात प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. तो या महामानवाने दिलेला आहे. आपण लोकतंत्र, लोकशाही, संविधानासाठी लढत आहोत. आज समोर जे तरुण जे बसले आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की तुमचं भविष्य कसं जाणार. तुमचं भविष्य कोण ठरवणार? तुम्ही की हुकुमशाह हे आता तुम्हाला ठरवायचे आहे. भाजप म्हणतोय विरोधीपक्ष मांस खाणारा आहे मटण मच्छी खाणारा आहे. आज या देशात कुठल्या रंगाचे कपडे घाला ते सांगितलं जातंय. हे सांगणारे लोकं सत्तेत आले आहेत. कुणी काय खावं काय घालावं हा प्रश्नच नसला पाहिजे. भाजप जे तुमचं मत मागत आहे हे तुमची सेवा करण्यासाठी नाही. तर हुकुमशहाच्या मनातलं लादण्यासाठी मागत आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

भाजपने 400 पारचा नारा दिलाय, पण भाजप 200 च्या पार जाईल असे वाटत नाही, असे सांगतानाच त्यासंदर्भात एकंरीत गणितच आदित्य ठाकरे यांनी यावेळी मांडले. ते म्हणाले की, देशातील सद्यस्थिती पाहता कुठेच भाजपच्या बाजूने वातावरण नाही. बिहारमध्ये तेजस्वी यादव 15 ते 20 जागांवर जिंकतील असे चित्र आहे. दिल्लीतील सातच्या सात जागा आम आदमी पार्टी आणि काँग्रेस जिंकणार आहे. पंजाब आणि हरियाणातही आम आदमी पार्टीला संधी आहे. बंगालमध्ये ममतादीदींना भाजप हरवू शकत नाही. राजस्थानातही विरोधी वातावरण आहे आणि दक्षिणेकडील राज्यांनी तर भाजपला दरवाजेच बंद केले आहेत. महाराष्ट्रात जरी काही जागा भाजपला मिळाल्याच तरी 200 च्या पुढे जाता येणार नाही. 200 पार करायलाही भाजपला अडवलं जात आहे. तुम्हाला अनेक आमिषं दाखवली जातायत. जाहिरातींवर मोजता येणार नाही एवढा खर्च केला जातोय. भाजप विरोधात मतं करू नका तुमचं मत वाया जाईल असं सांगतायत. पण आता देशात परिवर्तनाचते वारे वाहू लागले आहेत. सगळीकडे भाजपला नाकारत आहेत. अब की बार भाजप तडीपार हे वातावरण दिसत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आमची दोन वेळा फसगत झाली. आम्हाला वाटलेलं की ही वाजपेयींची भाजप आहे. पण हा भारतीय जुमला पक्ष निघाला. यांनी नोटाबंदी केली. नोटबंदी झाली तेव्हा भ्रष्टाचार मिटणार होता. मात्र नोटाबंदी फेल झालंय हे जगाने मान्य केलंय. या नोटाबंदीचा काय फायदा झाला. 370 कलम काढलं तेव्हा आम्ही त्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. आताही आम्हाला तो निर्णय मान्य आहे. मात्र तेव्हा आम्हाला वाटलेलं की लडाखला चांगले दिवस येतील. मात्र आता तेथील जनता चाळीस चाळीस दिवस उपोषणाला बसली आहे. सोनम वांगचूक उपोषणाला बसले आहेत. लडाखचे भाजपचे खासदार ज्यांनी संसदेत केलेलं भाषण गाजलं होतं ते लोकांचे उपोषण सुरू असताना कुठे होते? देशाचा जीडीपी वाढत नाहीए, जीडीपी हा फक्त गॅस पेट्रोल डिझेलचा वाढला आहे. महागाई कुठेही कमी झालेली नाही. 2014 ला गॅसची किंमत 400 रुपये होती आता 1100 रुपये आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

”मिंधे गटाची वाईट परिस्थिती झाली आहे. हे आधी 22 25 जागा लढणार आहोत असं सांगत होते. आता 9 सीट मिळाल्या. त्यातल्या 5 बदलायला लावल्या आहेत. एक तर ताई अशा आहेत ज्यांना उद्धव ठाकरे यांनी पाच वेळा खासदार बनवलं त्यांना तिकीटचं दिलेलं नाही.ज्यांनी दिली त्यांना साथ त्यांचाच त्यांनी घात. ज्याच्यासाठी लढलो. कुठे कुठे पळालो. सुरत गुवाहटी ते आता घात करत आहेत. विधानसभेच्या निवडणूका आल्या तर तिकीट मिळेल की नाही अशी धास्ती अनेकांना आहे. आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे ते तुम्हाला माहित आहे. आपल्या काळात सगळ्यात मोठा कठिण काळ आला होता. कोव्हिडमध्ये अर्थ चक्र थांबू दिलेलं नव्हतं. दावोसमध्ये जाऊन 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली. साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक आणू शकलो होतो. ती गुंतवणूक लोकांसमोर आहे. यांच्या काळात आता सगळं गुजरातला जातंय. येत्या काळात टेस्लाचा प्लान्ट देशात येऊ शकतो. 2021 साली टेस्लाचं गोडाऊन शॉप्स महाराष्ट्रात येणार होते. त्यात केंद्राने मिठाचा खडा टाकला. आता मला केंद्र सरकारला सांगायचंय की किमान हा प्लान्ट तरी महाराष्ट्रात आणा. आमच्या महाराष्ट्राचं हक्काचं जे गुजरातला दिलं जातंय त्याच विरोधात आम्ही लढत आहोत. केंद्रात परिवर्तन केलं नाही तर खूप हे असंच सुरू राहणार. देश म्हणून प्रगती करायची असेल तर इंडिया म्हणून एकत्र यायला हवं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.