मला प्रचार करता येऊ नये म्हणून सरकारी यंत्रणेचा गैरवापर – सुषमा अंधारे

ठाण्याच्या उपमहापौर व महायुतीच्या उमेदवार मीनाक्षी शिंदे पैसे वाटतानाचा व्हिडीओ निवडणूक आयोगाला देऊन तक्रार केली. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना निधी देतो, कचाकच बटण दाबण्याचे आमिष दाखविले. कोल्हापुरातही भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनीही मतांचे लीड देणाऱया तालुक्यास पाच कोटींचा निधी  देण्याचे प्रलोभन दाखवले. यावर आदर्श आचारसंहिताभंगप्रकरणी निवडणूक आयोगाकडून साधी दखल घेतली गेली नाही. पण एका महिलेला आणि तिच्या तेरा महिन्यांच्या बाळाला न्याय मिळवून देण्याऐवजी आपल्याला तसेच आपल्या संपर्कातील 50-60 जणांना अक्षता वाटल्यासारखे बालहक्क आयोगाकडून वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या. राजकीय हेतूने प्रेरित होऊन आपल्याला प्रचार करता येऊ नये, यासाठीच सरकारी यंत्रणेचा अशाप्रकारे वापर केला जात आहे. यातून आपल्या फोनवरही लक्ष असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या व उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी आलेल्या सुषमा अंधारे यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत भाजपच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र्ा सोडले. यावेळी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, हर्षल सुर्वे, स्मिता सावंत-मांडरे, प्रतिज्ञा उत्तुरे, रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, मंजीत माने आदी उपस्थित होते.

दोन आठवडय़ांपूर्वी वर्धा येथील खासदार रामदास तडस यांच्या सूनेने तिच्या बाळासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिल्याने बालहक्क संरक्षण आयोगाने माझ्यासह संपर्कात असलेल्या 50-60 जणांना नोटिसा पाठवल्या आहेत. पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला न्याय मिळवून देण्याऐवजी सरकारी यंत्रणा जर आपल्या फोनवर नजर ठेवत असेल तर माझा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला.

महाविकास आघाडी 30 हून अधिक जागा जिंकेल

सुषमा अंधारे म्हणाल्या, विदर्भात मतदानाचा टक्का कमी होण्यामागे केवळ ऊनच कारणीभूत नाही, तर ईव्हीएमही आहे. लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत अद्यापही साशंकता आहे. त्यामुळे आपण दिलेले मत अपेक्षित उमेदवाराला जाणार नसेल तर ते द्यायचे कशाला, या भावनेमुळे मतदान कमी होत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ते जितका यंत्रणांचा गैरवापर करतील, तितके लोक अधिक चिडतील असे सांगत, ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी राज्यात 30 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला.