हे दबावाचे राजकारण! राजन साळवी यांच्यासह पत्नी मुलावरही गुन्हा दाखल

शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. साळवी यांचे मूळ घर, राहाते घर, हॉटेल, भावाचे घर या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. मिंधे गटात जाण्यासाठी दवाब असूनही साळवी हे जुमानत नाही हे पाहिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. साळवी यांनी आपल्यावर गुन्हा दाखल झाला याबद्दल काही वाटत नाही मात्र आपल्या मुलावर आणि पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात येतो ही खेदाची बाब असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मी हिंदूहृदय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक आहे, मी लेचापेचा नाही, मी घाबरलेलो नाही आणि घाबरणारही नाही अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 4-5 पथके धाडी टाकण्यासाठी रत्नागिरीत पोहोचली होती. या कारवाईबाबत विचारले असता साळवी यांनी म्हटले की, ‘शिंदे गटात गेलो नसेल म्हणून माझ्यावर राग असेल तर गुन्हा दाखल करा, अटक करा, काहीही करा मात्र पत्नीला आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करताय हे चुकीचे आहे. आपल्याविरोधात गुन्हा दाखल झालाय म्हणजे आपल्याला अटक होणारच आहे, मात्र तुरुंगात गेलो तरी  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच नाव माझ्या तोंडी असेल असे साळवी यांनी ठणकावून सांगितले.