अफगाणी हल्ल्यामुळे पाकिस्तान हादरला, पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय

जगज्जेत्या इंग्लंडची शिकार करणाऱया अफगाणिस्तानच्या हल्ल्याने पाकिस्तानही हादरला. सोमवारच्या ऐतिहासिक विजयाने इंग्लंडविरुद्धचा विजय हा केवळ एक अपघात नव्हता हे झुंजार वृत्तीच्या अफगाणींनी क्रिकेटविश्वाला दाखवून दिले. पाकिस्तानवर 8 विकेटस् आणि 6 चेंडू राखून विजय मिळवत अफगाणिस्तानने यंदाच्या वर्ल्ड कपमधील दुसरा, तर स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा तर पाकिस्तानविरुद्ध पहिलावहिला ऐतिहासिक विजय नोंदविला. 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणारा इब्राहिम झदरान या सामन्याचा मानकरी ठरला.

पाकिस्तानकडून मिळालेले 283 धावांचे लक्ष्य 49 षटकांत 2 बाद 286 धावा करून पूर्ण केले. रहमानुल्लाह गुरबाझ (65) व इब्राहिम झदरान (87) यांनी 21.1 षटकांत 130 धावांची सलामी देत अफगाणिस्तानला खणखणीत सुरुवात करून दिली. शाहिन शाह आफ्रिदीने गुरबाझला उमर मीरकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली, तर हसन अलीने झदरानला यष्टीमागे मोहम्मद रिझवानकरवी झेलबाद केले. सलामीच्या जोडीने भक्कम पायाभरणी केल्यावर रहमत शाह (नाबाद 77) व कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (नाबाद 48) यांनी शांत डोक्याने फलंदाजी करीत अफगाणिस्तानच्या विजयाचा कळस चढविला.

बाबरला सूर गवसला

त्याआधी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 7 बाद 282 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. अब्दुल्लाह शफिक (58) व इमामुल हक (17) यांनी पाकिस्तानला अर्धशतकी सलामी दिली. इमाम बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार बाबर आझमने 74 धावांची खेळी करीत पाकिस्तानचा डाव सावरला. बाबरला सूर गवसल्याने पाकिस्तानला दिलासा मिळाला. मात्र, त्यांना आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. शफिकने 75 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार ठोकले, तर बाबरने 92 चेंडूंत 4 चौकार व एका षटकारासह आपली खेळी सजविली.

शादाब-इफ्तिखारचा प्रतिकार

मोहम्मद रिझवान (8) आज अपयशी ठरल्यानंतर सौद शकिलने 25 धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर शादाब खान (नाबाद 40) व इफ्तिखार अहमद (नाबाद 40) यांनी अखेरच्या काही षटकांत हाणामारी केल्याने पाकिस्तानला पावणे दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. शादाबने 38 चेंडूंत एक षटकार व एक चौकार लगावला, तर  इफ्तिखारने 27 चेंडूंत 4 टोलेजंग षटकारांसह एक चेंडू सीमापार पाठविला.

नूर अहमदचा वेगळाच नूर

अफगाणिस्तानचा नव्या दमाचा डावखुरा फिरकीपटू नूर अहमदने अब्दुल्लाह शफिक, बाबर आझम व मोहम्मद रिझवान या प्रमुख फलंदाजांना बाद करून पाकिस्तानची आघाडीची फळी कापून काढली. त्याच्या अफलातून गोलंदाजीने सामन्याचा नूरच पालटून टाकला. नूर अहमद व राशीद खान यांच्या कंजुष गोलंदाजीमुळे पाकिस्तानला तीनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही. राशीदला एकही बळी मिळाला नाही, पण त्याने 10 षटकांत केवळ 41 धावाच दिल्या. याचबरोबर मुजीर उर-रहमानने 2, तर मोहम्मद नबी व अझमतुल्लाह ओमरझाई यांनी 1-1 विकेट मिळवली.

अफगाणिस्तानचा वर्ल्ड कपमधील तिसरा विजय

अफगाणिस्तानने 2015मधील पदार्पणाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडचा पराभव करुन पहिला विजय साकारत इतिहास घडविला होता. त्यानंतर वर्ल्ड कपमधील दुसऱया विजयासाठी त्यांना तब्बल 8 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. 2023च्या वर्ल्ड कपमध्ये या संघाने चक्क जगज्जेत्या इंग्लंडला धूळ चारण्याचा पराक्रम करून दाखविला. या विजयाने मनोबल उंचावलेल्या अफगाणिस्ताने आज पाकिस्तानलाही पराभवाची धूळ चारली. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानचा पाकिस्तानवरील हा पहिलाच विजय होय हे विशेष! याआधी पाकिस्तानने सलग सात विजय मिळविले होते.