अकरावी ऑनलाइन प्रवेश उद्यापासून प्रवेशनोंदणी, अर्जाचा भाग 1 भरता येणार

अकरावी ऑनलाईन प्रवेशाला सुरुवात झाली असून शुक्रवार, 24 मेपासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटवर जाऊन प्रवेशनोंदणी आणि अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. दहावीच्या निकालापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यापूर्वी उद्या 23 मेपर्यंत विद्यार्थ्यांना डमी अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत दिली आहे.

अकरावी प्रवेशासाठी https://11thadmission.org.in ही वेबसाइट खुली करून देण्यात आली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन दिवस विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातील माहिती महाविद्यालय किंवा मार्गदर्शन पेंद्रावरून तपासून घेता येणार आहे. दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या तारखेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती शिक्षण उपसंचालक यांना ऑनलाइन प्रमाणित करता येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्यास सुरुवात होईल. निकालानंतर पाच दिवस विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यापासून पहिली फेरी ही 10-15 दिवसांची असेल, दुसरी फेरी 7-8 दिवस, तिसरी फेरी 7-8 दिवस असणार आहे. त्यानंतर रिक्त जागांनुसार विशेष फेऱया घेतल्या जाणार आहेत. पहिल्या विशेष फेरीनंतर अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कोटा, इनहाऊस कोटा आणि अल्पसंख्यांक कोटा आदी कोटय़ाअंतर्गत प्रवेश घेण्याबाबत आवश्यक सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.