आळंदी केळगाव रस्त्यालगतचे खड्डे धोकादायक, पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांत नाराजी

आळंदी शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या बंदिस्त पाईप लाईनला गळती सुरू झाल्याने तत्काळ देखभाल दुरुस्ती आळंदी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाने करून घेतली. कुरुळी जॅकवेल येथून आलेली पिण्याचे पाण्याची बंदिस्त पाईपलाईन आळंदीला नेण्यात आली आहे. सदर लाईनला गळती असताना लिकेज काढून घेतले. मात्र त्या ठिकाणचा रस्ता देखभाल दुरुस्ती गेल्या आठ दिवसांपासून प्रलंबित आहे. यामुळे केळगाव रस्ता रहदारीला धोका निर्माण झाला आहे.

यामुळे केळगाव रहिवासी, नागरिक, प्रवासी, वाहन चालक यांस तेथून ये जा करताना गैरसोय होत आहे. आळंदी नगरपरिषदेने देखभाल दुरुस्तीला प्राधान्याने काम करणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष केले. वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याने येथील नागरिकांत मोठी नाराजी आहे. तात्काळ खड्डे भारण्यासह रस्ता देखभाल दुरुस्तीचे काम करण्याची मागणी केळगाव ग्रामस्थांचे वतीने पोलीस पाटील युवराज वहिले यांनी केली आहे. आळंदी नगरपरिषदेस केळगाव ग्रामस्थ नेहमी सहकार्य करीत असून देखील आळंदी नगरपरिषद नागरी सेवा सुविधेतील पिण्याची पाईप लाईनच्या लीकेजचे काम झाल्या नंतर रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्याचे मागणीकडे आळंदी नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याने वाहन चालक, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

केळगाव आळंदी या मुख्य रस्त्यावर आळंदी नगरपरिषदेच्या वतीने दहा फूट बाय दहा फूटचे खड्डे घेऊन पाईपलाईन दुरुस्ती करण्यात आले. गेल्या आठ दिवसापूर्वी सुरु केलेले काम पूर्ण झाले. मात्र 6 दिवसापासून येथील रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही. खड्डे भरण्यासाठी कारणे देत काम लांबविल्याचे नागरिकांनी सांगितले. या संदर्भात बांधकाम अभियंता सचिन गायकवाड, संजय गिरमे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख शीतल जाधव यांना या बाबत माहिती दिली. रस्त्याचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यास संबंधितांशी सांगितले असून बुधवारी (दि. 17) दिवसभरात काम पूर्ण केले जाईल असे सांगितले.