विकेंडलाही सुरू राहणार दुय्यम निबंधक कार्यालये

मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी 30 आणि 31 मार्च या कालावधीत सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे मुंबई विभाग नोंदणी उपमहानिरीक्षक राजू थोटे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) यासंबंधीचे कामकाज करण्यासाठी व 1 एप्रिल रोजी दरवर्षी वार्षिक बाजारमूल्य दर प्रसिद्ध होत असल्यामुळे मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी होत असते तसेच आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या कामकाजासाठी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी व नोंदणी कार्यालये शासकीय सुट्टीच्या कालावधीत म्हणजेच 29 ते 31 मार्च रोजी सुरू राहणार असल्याने या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

– कृष्णा जाधव, मुंबईचे मुद्रांक जिल्हाधिकारी