रोज नवनवीन घोषणा करण्यापेक्षा… अंबादास दानवेंनी राज्य सरकारला फटकारले

राज्यात व देशभरात बालविवाह प्रतिबंधक योजना कायदा लागू केलेला असतानाही अद्याप सरकार पूर्णपणे बालविवाह रोखण्यात अपयशी ठरली आहे. त्यावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ”राज्य सरकारने महिलांसाठी रोज नवनवीन योजनांची घोषणा करण्यापेक्षा त्यांनी मुलींच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे’, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

अंबादास दानवे यांनी एका वृत्तपत्रात बालविवाहबाबतची छापून आलेली बातमी ट्विटरवरून शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. या बातमीनुसार गेल्या पाच वर्षात देशभरात 3254 तर राज्यात 185 बालविवाह झाले असून दरवर्षी ही संख्या वाढत असल्याचे म्हटले आहे. यावरून अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला फटकारले.

”परभणी येथे 27 ऑगस्ट रोजी शासन आपल्या दारी या कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या विकासासाठी शक्ती गट निर्माण करणार असल्याची घोषणा केली आहे.रोज नवनवीन घोषणा करण्यापेक्षा कागदावरील व दोन हाफ मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मुलींच्या या स्थितीकडे लक्ष द्यावे. आपल्याला सत्तेची हाव नाही आणि छत्रपती शिवरायांच्या विचारावर तुम्ही शासन चालवत आहात तर या भयावह घटना तुमच्याच आणि देशातील महाशक्तीच्या कार्यकाळात घडत आहेत,यावर जरा लक्ष असू द्या’, असे ट्विट दानवे यांनी केले आहे.