नीलिमा चव्हाणांच्या विरोधात प्रथमदर्शी पुरावे, हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांच्या आत्महत्येप्रकरणी ऍड. नीलिमा चव्हाण यांच्याविरोधात प्रथमदर्शनी पुरेसे पुरावे आहेत. मोरे यांच्या आत्महत्येत नक्कीच काहीतरी गूढ आहे. याचा अधिक तपास होणे गरजेचे आहे, असे नमूद करत उच्च न्यायालयाने बुधवारी ऍड. चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

न्या. एन. आर. जमादार यांच्या खंडपीठासमोर ऍड. चव्हाण यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. घटनेच्या एक दिवसआधी ऍड. चव्हाण व मोरे यांच्यात तब्बल 56 कॉल झाले. व्हॉटस्ऍप ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल झाले. माझ्याशी बोलला नाहीस तर मी स्वतःला संपवून टाकेन, असे ऍड. चव्हाण मोरे यांना वारंवार धमकावत होत्या. त्यांच्यात झालेल्या संभाषणातून ही बाब समोर आली आहे. घटनेच्या काही तासआधीही दोघांमध्ये संभाषण झाले होते, असा दावा पोलिसांनी केला.

ऍड. चव्हाण यांना महापालिका निवडणूक लढवायची होती. उमेदवारी मिळवून देण्याचा आग्रह त्या मोरे यांच्याकडे करत होत्या. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. त्याची नोंद घेत न्यायालयाने ऍड. चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.