संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला रोखले पाहिजे! फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन्स फॉर सोशल जस्टिस,  सेक्युलॅरिझम अ‍ॅण्ड डेमॉक्रॅसी यांचे आवाहन 

भाजप देशात जात आणि धर्माच्या नावाखाली द्वेष निर्माण करत आहे. सर्वसामान्यांना संविधानाने दिलेले अधिकार आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वाला पायदळी तुडवून संविधान बदलण्याची भाषा वारंवार केली जात आहे. देशावर हुकूमशाही लादली जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकजूट होऊन इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून भाजपला रोखले पाहिजे, असे आवाहन फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन्स फॉर सोशल जस्टिस आणि सेक्युलॅरिझम अॅण्ड डेमॉव्रॅसी या सामाजिक संघटनांनी केले आहे.

देशात लोकसभा निवडणूक विविध टप्प्यांत होत असून 19 एप्रिलला प्रथम टप्प्यातील मतदान होत आहे. मात्र, सर्वसामान्यांनी परिस्थितीचे गांभीर्य जाणून भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करावे, असे आवाहन नागपूरमधील 80 सामाजिक संस्थांच्या संघटनेने केले आहे.

असंवेदनशील भाजप सरकार 

भाजप हिंदू राष्ट्र निर्माण संकल्पना मनुस्मृती आधारित आहे. शिक्षण, कामगार, शेतकरी, महिलांबाबत भाजप सरकार संवेदनशील नाही. निवडणूक रोखे खरेदीमध्ये कोटय़वधीचा भ्रष्टाचार, प्रचंड बेरोजगारी, महागाई, इतर धर्मीयांवर अन्याय वाढले आहेत. विरोधी पक्ष नष्ट करून हुकूमशाही पद्धतीने सरकारे चालवली जात आहेत, असा आरोप या संघटनांनी केला आहे.

विभाजन टाळा, भाजपला पराभूत करा!

वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी आणि इतर उमेदवार ज्या पक्षांनी उभे केले आहेत त्यामुळे मतविभाजन होऊन भाजपला त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे विभाजन टाळून भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांनाच निवडून देण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे.