आभाळमाया – ‘गगनयान’ यश!

>> वैश्विक,  [email protected]

21  ऑक्टोबरची सकाळ. आठ वाजल्यापासून अनेक उत्सुक नजरा घरोघरी टीव्हीच्या पडद्यावर रोखल्या होत्या. मनात खात्री होती आणि हुरहुरसुद्धा.

चांद्रयान-2चं हाती येत असलेलं यश काही क्षणांनी हिरावून नेल्याची दृश्यही विज्ञानप्रेमींनी पाहिली होती. त्यानंतर चार वर्षांनी चांद्रयान-3ने मिळवलेल्या अपूर्व यशामुळे पुन्हा आपला आत्मविश्वास वाढला. अशा अवकाशमोहिमांमध्ये यशापयशाची शक्यता सारखीच असते. आपल्याशी ‘स्पर्धा’ केल्यासारखं निघालेलं रशियाचं ‘ल्युना’ यान भरटकून अपयशस्वी ठरल्याची बातमी आलीच होती. त्यामुळे चांद्रयान तीन हे यान आजपर्यंत कोणत्याही देशाचं यान न पोचलेल्या चंद्राच्या काळोख्या दक्षिण भागात नेमक्या ठिकाणी उतरणार की नाही त्यावरच ‘प्रज्ञान’ रोव्हर चालणार की नाही? असे अनेक प्रश्न, खरंतर शंकाकुशंका मनात होत्या. सगळे प्रामाणिक प्रयत्नसुद्धा. एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा सुरुवातीला लक्षातही न आलेल्या नगण्य वाटणाऱ्या गफलतीमुळे अक्षरशः मातीमोल होऊ शकतात किंवा पाण्यात जाऊ शकतात याचा अनुभव जगात अनेक देशातल्या अंतराळ-संशोधन संस्थांनी घेतलेला आहे. आपल्या देशाच्या कल्पना चावलासह अनेक अंतराळयात्रींचे ‘कोलंबिया’ यान परतीच्या प्रवासात भस्मसात झालं त्याच्या वेदना आजही ताज्या आहेत.

मानवरहीत यानाला अपयश आलं तरी ते दुःखदायकच. कारण त्यातही पैशाबरोबरच अनेक वर्षांचे परिश्रम वाया जातात आणि समानव यान अयशस्वी ठरलं तो जीवितहानीचा आघात पृथ्वीवासीयांना हेलावून टाकतो. तरीही धाडस करून पुढच्या अंतराळप्रवासासाठी विक्रम करायला नवे अंतराळयात्री सज्ज असतातच. संपूर्ण मानवतेसाठी ते आपले प्राण पणाला लावत असतात. यश मिळालं तर मात्र त्यासारखी दुर्लभ गोष्ट कोणतीच नसते.

2025पर्यंत हिंदुस्थानही अंतराळात आपला महिला किंवा पुरुष अंतराळयात्री पाठवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. चांद्रयान-3, मंगळयान आणि आदित्य-एल-1 या यशस्वी मोहिमांमुळे आता अंतरिक्षातील पुढची पावलं टाकायला आपण तयार आहोत. त्यासाठी आपली अनेकदा यश देणारी लॉन्च व्हेईकल-3 प्रकारची रॉकेट्स तयार आहेत. हे तंत्रज्ञान आपण कष्टसाध्य केलेलं आहे. अशा उड्डाणांमध्ये सॉलीड, लिक्वीड आणि  क्रायजेनिक इंधनांचे टप्पे असतात. शेवटचं क्रायजेनिक तंत्रज्ञान द्यायला त्या काळी ‘मित्र’ असणाऱ्या रशियानेही नकार दिला होता. बाकीचे जगही स्वस्थ होतं. अंतराळ स्पर्धेत आणखी एक स्पर्धक कुणाला हवाय! अखेरीस आपल्या शास्त्रज्ञांनी, संपूर्ण देशी बनावटीचं क्रायजेनिक इंजिन तयार केलं आणि अगदी जीएसएलव्ही म्हणजे जिओस्टेशनरी किंवा ‘भूस्थिर’ कक्षेत उपग्रह सोडता येईल असा अग्निबाण अथवा रॉकेट निर्माण केलं. एखाद्या उपग्रह, अंतराळातून सतत आपल्याच देशाच्या भूभागावर फिरत ठेवायचा असेल तर त्याची कक्षा अवकाशात सुमारे 36800 किलोमीटरवर असावी लागते. ते कसं ते नंतरच्या लेखात पाहू.

असं यश प्राप्त केल्याने ‘इस्रो’कडे जगातल्या अनेक देशांचे उपग्रह अंतराळात ‘उडवण्यासाठी’ येऊ लागले. एकाच वेळी शंभराहून अधिक उपग्रह उडवून ते विविध कक्षांमध्ये स्थापित करण्याचा विक्रमही ‘इस्रो’ने केला. पूर्वी आपले प्राथमिक उपग्रह रशिया, फ्रेंच, गियाना वगैरे ठिकाणाहून अंतराळात जात असत. त्या वेळी आपल्याकडे प्रगत तंत्रज्ञान साध्य करण्याएवढा पैसाही नव्हता. परंतु बदलत्या काळात अंतराळ स्पर्धा पैसा देणारी ठरणार आहे… अनेक छोटय़ा देशांच्या अर्थकारणाला. अंतराळप्रवास स्वतः घडवणं परवडणारं नाही. हिंदुस्थानच्या अंतराळयात्री 2024पर्यंत पहिल्या ‘गगनयाना’तून अंतराळात पोचला तर रशिया, अमेरिका आणि चीननंतर तसं यश साध्य करणारा हिंदुस्थान हा पृथ्वीवरचा चौथा देश ठरेल.

यासाठीच ‘गगनयान’चं महत्त्व मोठं आहे. मात्र माणूस अंतराळात पाठवायचा म्हणजे त्याला पृथ्वीवर परत आणणारं ‘मोडय़ुल’ त्या रॉकेटवर असायला हवं आणि अंतराळप्रवास संपल्यावर ते सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरायलाही हवं. हीच सर्व चाचणी ‘गगनयान’च्या ‘टेस्ट फ्लाईट’मध्ये अवघ्या दहा मिनिटांत यशस्वीरीत्या करण्यात आली.

बघता बघता ‘गगनयाना’चं परीक्षण सुरू झालं. अंतराळात झेपावलेल्या यानाने बंगळुरू येथील ‘इस्रो’च्या यंत्रणेद्वारा दिलेले ‘आदेश’ तंतोतंत पाळून आपली कक्षा गाठली. क्षणाक्षणाने ते पुढे सरकत विशिष्ट बिंदूपाशी पोचताच पुन्हा पृथ्वीकडे वळलं. दरम्यान त्यावरील मानवरहीत ‘क्रू-मोडय़ुल’ वेगळं होऊन विलक्षण वेगाने बंगालच्या उपसागराकडे येऊ लागलं. आणखी काही क्षणात त्याचं सुखरूप जलावतरण करणारी तीन पॅरॅशूटस उघडली. प्रत्येकी 25 मीटर व्यासाच्या या पॅरॅशूटस्नी तोलून योग्य वेगाने ते ‘मोडय़ुल’ सागरात सुरक्षित उतरवलं आणि या अवघ्या दहा मिनिटांच्या थरारनाटय़ाने भावी यशाची नांदी केली. ‘इस्रो’ प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले, यात तीन परीक्षणाचा गुच्छच होता. यान व्यवस्थित उडणं, उड्डाणयान सुनियंत्रित असणं आणि संभाव्य अंतराळयात्रींसाठीचं ‘मोडय़ुल’ सुखरूप पृथ्वीवर उतरवणं. हे सर्व साध्य झाल्याचा आनंद आहे. तो जसा त्या वैज्ञानिकांच्या पथकाला आहे तसाच सगळय़ा देशालाही आहेच!