मुद्दा – उच्चपदस्थांची सत्ताशरणता!

>> अनिल दत्तात्रेय साखरे

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांचा राजकारण प्रवेश’ सदर वृत्त धक्कादायक वाटले नाही. सरन्यायाधीश सदाशिवम आणि रंजन गोगोई यांच्यानंतर आता कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले अभिजीत गंगोपाध्याय आपल्या पदावरून राजीनामा देऊन राजकारण प्रवेश करणार आहेत, भारतीय उच्चपदस्थांची सत्ताशरणता बघताना ज्या उच्चपदस्थांनी देशाच्या घटनेशी बांधिलकी ठेवून आपल्या पदाचा योग्य तो मानसन्मान राखून सरकारला योग्य वाटेने मार्गक्रमण करायला लावावे, जिथे चुका होतील तिथे सरकारचे कान धरावे आणि आपले कर्तव्यकठोरपणे बजावून देशाला समाजाला आपल्या वागणुकीमधून काही दिशा द्यावी, तेच उच्चपदस्थ असे सत्ताशरण जाताना बघून सामान्य जनतेने कोणाकडे बघावे? हा प्रश्न पडतो.

सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी न्यायालय राजकारणमुक्त राहिली पाहिजे तरच लोकशाही जिवंत राहील हे वास्तव सर्वोच्च पदावरून निवृत्त होणाऱ्यांना कसे कळत नाही.

त्यासोबतच देशभरातील घटनात्मक आणि प्रतिष्ठsच्या पदावरील सर्वोच्च अधिकारी, पोलीसप्रमुख, सरन्यायाधीश, लष्करप्रमुख यांसारख्या अतिमहत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने राजकारण प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांना राज्यपालपद, राज्यसभेत नियुक्ती किंवा इतर सरकारी लाभाच्या पदावर नियुक्ती मिळवून आपल्या निवृत्तीनंतर आरामदायी जीवनाची सोय करून ठेवतात, पण त्यामुळे या उच्चाधिकाऱ्यांनी आपल्या सेवाकाळामध्ये घेतलेल्या निर्णयावर, गाजवलेल्या अधिकारांवर, त्यांच्या निःपक्षपाती कामकाजासंदर्भात खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं.

यासंदर्भात महाभारतातील एक प्रसंग उद्बोधक वाटेल, तो असा की, महाभारत युद्ध संपल्यावर सर्व पांडव श्रीकृष्णांना भेटायला गेले, आगत स्वागत झाल्यावर युधिष्ठर म्हणतो की, काwरवांचे राज्य अन्यायाचे होते, माझे राज्य न्यायाचे असेल. तेव्हा कृष्ण गालात हसतात. त्याचे कारण विचारले असता ते म्हणाले, युद्धात आपल्या हातून पण पापे घडली आहेत, अनेक माणसांची हत्या घडली आहे. आपण काही अगदी सरळपणे हा विजय मिळवला नाही. तेव्हा पापक्षालन करण्यासाठी तुम्ही वनात जा, तेथे भगवंताचे नामस्मरण, चिंतन करा व एक महिन्याच्या नंतर परत या, पांडवांनी त्याप्रमाणे केले. परत आल्यावर कृष्ण म्हणाले, जंगलातील मुक्कामामध्ये काही विशेष आढळलं काय, एखाद्या प्रसंग आठवतो का? तेव्हा प्रत्येकानं आपापले प्रसंग सांगितले. शेवटी अर्जुन आपला प्रसंग सांगताना म्हणाला, एकदा फिरत असताना एक मोठा प्राणी मरून पडला होता व काही गिधाडे त्याला खात होती, पण त्यात एक गिधाड वेगळे होते. फार छान, चांगले, सुंदर दिसत होते आणि त्याच्या पंखावर वेदवचने कोरली होती आणि तरीही ते इतर गिधाडाप्रमाणे सडलेले मांसच खात होते. मला मोठं आश्चर्य वाटले व वाईटही वाटले. त्यावर भगवान म्हणतात, ‘‘अर्जुना, सत्य, त्रेता, द्वापारयुगात समाजात जे चिंतक, तत्त्वज्ञ, विचारवंत, सज्जन, तपस्वी, बुद्धिमान ऋषी आहेत, त्यांचा राजसतेवर खूप मोठा वचक आहे. म्हणूनच राजसत्ता मनमानी कारभार करू शकली नाही, जास्त मस्तवाल नाही झाली, पण कलियुगात 21व्या शतकात राजकर्ते मोठे हुशार असतील. पैसे, मानमरातब, पदपं, अनुदान वगैरे देऊन समाजाला, देशाला ज्यांनी दिशा द्यावी, संस्थांचे ज्यांनी नियमन, मार्गदर्शन करावे अशा ज्ञानी, विचारवंतांना, उच्चपदस्थांना, नियामकांना ते जणू खरेदी करतील, भ्रष्ट करतील. मग हीच माणसे सध्याचे राज्यकर्ते कसे चांगले आहेत, सज्जन आहेत, कायदेकानू मानणारे आहेत असे सांगत देशभर फिरतील, त्यांची वकिली करायला आपली बुद्धी कामी आणतील आणि आपली निवृत्ती सुखाची करतील.’’ हे भविष्य कृष्णाने द्वापारयुगामध्ये वर्तवून ठेवले होते, ते या कलियुगात खरे होत आहे. या रूपकात कृष्णाने वर्णन केलेले वेदवचन कोरलेले गिधाड म्हणजे आताची उच्चपदस्थ माणसे. अशा व्यक्तींना राजकारणात प्रवेश करण्याची सवलत नसावी किंवा युरोप-अमेरिकेप्रमाणे निवृत्तीनंतर दोनचार वर्षांचा ‘कुलिंग ऑफ’ कालावधीचे बंधन असणे आवश्यक आहे.