चिखला मॅग्निज खाणीतील कामगाराचा मृत्यू प्रकरण, मॅग्निज खाण प्रशासकीय कार्यालयाला नागरिकांचा घेराव

 तुमसर तालुक्यातील चिखला येथिल भुमीगत मॅग्निज खाणीमध्ये कामावर असलेल्या कंत्राटी कामगारांवर खाणीत काम करीत असताना दगडाचा ढिगारा अंगावर कोसळल्याने चेतन हेमराज शिवणे नामक मजुराचा मृत्यू झाल्याची घटना 4 मे रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. दरम्यान 5 मे रोजी सकाळी मृत कामगारांचे मृतदेह शवविच्छेदन करुन कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आले. व मृतदेह चिखला माॅयल प्रशासनाच्या रुग्णवाहिकेतून मृतकाच्या घरी आणण्यात आले. त्यावेळी मृतक चेतन शिवने यांच्या कुटुंबीयांनी रौद्र रूप धारण चेतनचा मृतदेह थेट रुग्णवाहिकेतून चिखला मॅग्निज खाण प्रशासकीय कार्यालय परिसरात समोर नेण्यात आला.परिणामी माॅयल खाण प्रशासनात एकच खळबळ उडाली.

यावेळी मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ आर्थिक मदत व चिखला मॅग्निज खाणीत नोकरीवर घेण्याचे लेखी आश्वासन देत नाही. तो पर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा मृतांच्या नातेवाईकांसह चिखला येथिल नागरीकांनी घेतल्याने प्रकरण अधिकच चिघळले. दरम्यान सदर प्रकरणी मृतक कामगारांच्या परिवारातील सदस्य व चिखला येथिल नागरिकांनी चिखला मॅग्निज खाण प्रशासकीय कार्यालयाला घेराव घालत पाच तास ठीय्या आंदोलन केले. दरम्यान चिखला मॉयल प्रशासनाचे अभिकर्ता उपमहाप्रबंधक यु.ए.भाटी. खाण प्रबंधक निलेश खेडेकर, आमदार राजू कारेमोरे, पोलीस उपविभागीय अधिकारी,रश्मिता राव,पोलीस निरीक्षक विनोद गिरी,सिहोरा पोलीस निरीक्षक नितिन मदनकर यांनी घटनास्थळी दाखल होत, सदर मृतकाच्या परिवारासोबत व येथील स़ंतप्त नागरीकांसोबत चर्चा करुन मृतांच्या कुटुंबीयांतील वारसाला कंत्राटी पदावर नोकरीवर घेण्याचे व मृतांच्या मुला़चे इयत्ता दहावी पर्यंतचे मॉयल प्रशासनाकडून मोफत शिक्षण , व मृतांच्या पत्निला पंधराशे रुपये पेन्शन,व मायल इंडिया लिमिटेड कंपनी व्दारा मिळणारे सर्व देय देण्याचे मॉयल प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडुन लेखी आश्वासन देण्यात आल्याने मृतांच्या नातेवाईकांनी व नागरीकांनी आंदोलन मागे घेतले. व मृतकांवर येथिल स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.