साहित्यजगत – पीएचडी पहावी करून

>> रविप्रकाश कुलकर्णी

विद्यापीठाला प्रबंध सादर करून पीएचडी पदवी मिळवणे हा प्रकार नेमका कुठून आणि केव्हापासून सुरू झाला याचा केव्हातरी मागोवा घ्यायला हवा. मात्र मराठीबाबत सांगायचे तर पहिले पीएचडीधारक आहेत पु. ग. सहस्त्रबुद्धे. ‘स्वभाव लेखन – द डेव्हलपमेंट ऑफ दि आर्ट ऑफ कॅरेक्टरजेशन इन मराठी लिटरेचर फ्रॉम 1861 टू 1938’, हा प्रबंध त्यांनी 20 डिसेंबर 1938 रोजी मुंबई विद्यापीठात सादर केला. 29 जून 1939 रोजी तो स्वीकृत होऊन त्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. स्वभाव लेखनाची मूलतत्त्वे सांगणे व त्याअन्वये मराठी वाङ्मयाचे संशोधन करणे असे प्रस्तुत प्रबंधाचे दुहेरी कार्य आहे. त्यानंतर आजतागायत केवळ मराठीमध्ये किती पीएचडीधारक आहेत हे सांगणे सोपे नाही. तेसुद्धा एक शोधकार्य ठरेल. त्याखेरीज पीएचडी मिळवण्याचा अनुभव सांगणे, लिहिणे हादेखील स्वतंत्र विषय होऊ शकतो.

सहज आठवणारे उदाहरण म्हणजे अविनाश चाफेकर यांनी ‘देवा शपथ खरं सांगतोय’ या पुस्तकात विद्यापीठाशी त्यांनी जी झुंज दिली याबाबत लिहिलेले आहे, पण असे उदाहरण अपवादात्मक. डॉ. उषा रामवाणी-गायकवाड यांनी ‘निर्वासित’ हे आपले आत्मकथन लिहिलेले आहे. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ आणि माझी पीएचडी ही प्रकरणे आहेत. अलीकडच्या काळात गाइडशिवाय केलेली ही एकमेव पीएचडी असावी. नोबेल प्राइज आणि त्यामागे होणारा काळा-पांढरा बाजार त्याच्यावरती
आयर्विंग वॅलेसने प्रचंड अभ्यास करून ‘द प्राइज’सारखी कादंबरी लिहिली.

हे सगळे आठवायचे कारण एक पुस्तक हातात आले त्याचे नाव आहे ‘पीएचडी पहावी करून’ डॉ. सायली नार्वेकर लिखित या छोटेखानी पुस्तकाचे प्रकाशक आहेत रत्नागिरीचे अवेश्री प्रकाशन. कुठलेही व्यावसायिक आमिष नसताना एक संसारी स्त्राrने केवळ आपल्या नावामागे डॉ. ही उपाधी लागावी यासाठी केलेला बिकट प्रवास म्हणजे ही छोटेखानी कहाणी आहे. त्या म्हणतात, ‘नाच गं घुमा’सारख्या आपण स्त्रियांवर लादलेल्या रीतिरिवाज, मर्यादा आणि कर्तव्याच्या रिंगणात अविरत घुमत राहतो. या चौकटी मोडून काढण्यात जी स्त्राr यशस्वी होते ती पुढे जाते अन् जिच्याकडे ते मोडण्याची ताकद नसते ती घुमा नाचत राहते रिंगणभर. आपल्या चाकोरीबद्ध आयुष्यात काहींना जोडीदाराची साथ उत्तम लाभते. एक स्त्री काय करू शकत नाही…! मिळालेल्या संधीचे सोने ती करू शकते, नाहीतर ती संधी दवडून आपला आत्मघातदेखील करू शकते. पण मी स्वतला नशीबवान समजते की, माझा जोडीदार म्हणजेच यजमान माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.’

अर्थात या प्रवासात त्यांना अनंत निराशेचे क्षण आले. प्रसंगी सोडून द्यावा का हा ध्यास पीएडीचा, नाहीतरी काय नावाच्या अगोदर फक्त डॉ. एवढीच पदवी लागणार आहे, असेही विचार त्यांच्या मनात आले. पण त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, ‘माझ्या त्या स्वप्नाला उतरवणारी माझी ती वाट सरळ, सोपी नव्हती. परंतु संयम, मनोनिग्रह, अथक मेहनत अन् आत्मविश्वासाच्या शिदोरीवर तरून गेले आणि ध्येयपूर्तीच्या त्या स्वप्नाला मी कवेत घेतले. या माझ्या पीएचडीच्या 2013-2020 या सलग सात वर्षांच्या काळात जे आंबट-गोड अनुभव आले ते एकहाती लिहीत गेले.’ डॉक्टरेट मिळवण्यासाठी प्रत्येकालाच कमी-अधिक प्रमाणात सोसावे लागते, पण म्हणून हातपाय गाळून चालत नाही. अर्थात या जिद्दीमुळेच सायली नार्वेकर यांना पीएचडी मिळाली हे उघड आहे, पण त्याहीपेक्षा त्यांनी आपले स्वानुभव लिहिले याला विशेष महत्त्व आहे. अवेश्रीसारख्या आडवाटेवरच्या प्रकाशकांनी ते अनुभव प्रकाशित केलेत यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे.