प्रासंगिक – अष्टपैलू आचार्य अत्रे

>> प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

आचार्य अत्रे यांनी मराठी भाषेत विडंबन हा काव्यप्रकार फक्त रुजवला नाही तर तो लोकप्रिय केला. ‘झेंडूची फुले’ हा त्यांचा विडंबन संग्रह. अर्थात विडंबन म्हणजे कुणावर टीका नाही, फक्त मूळ कवितेवर व्यंगात्मक भाष्य. ते ज्याला उत्तम जमते तो विडंबनकार होय.

मुळात उत्तम पत्रकार असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ‘मराठा’ आणि ‘नवयुग’ ही वृत्तपत्रे अखेरपर्यंत चालविली. ते उत्तम कवी आणि शिक्षणतज्ञ होते. अत्रे हे हाडाचे पत्रकार होते. ते परखड वत्ते होते. ते वत्ते कसे झाले याचा किस्सा मोठा गंमतीदार आहे. त्यांचे काका एमईएस वाघिरे सासवड येथे शिक्षक होते. सासवडच्या याच हायस्कूलमधून आचार्य अत्रे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले होते. त्या शाळेत विद्यार्थ्यांनी दर आठवडय़ाला एका विद्यार्थ्याने भाषण देण्याची प्रथा होती. भाषण देण्याची वेळ आचार्य अत्रेंवर आली त्यावेळी एक वाक्य झालं की ते घाबरून झालं असं म्हणत. ते झालं असं म्हणणं त्यांची घाबरगुंडी उडाल्याचे द्योतक होते. तेव्हा त्यांनी आपण उत्तम वक्ता व्हायचं असं निश्चयाने ठरवून खास प्रयत्न केले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी त्यांनी केलेली भाषणे गाजली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा वारसा चालवणारे ते निर्भीड पत्रकार होते. त्यांचे उजवे हात, त्यांच्या हाताखाली कडक शिस्तीत ‘मराठा’ दैनिकात काम करणारे दत्तू बांदेकर व इतर मंडळींच्या सहकार्याने त्यांनी ‘साहित्य झब्बूशाही मंडळ’ स्थापन केले. त्या मंडळात दर आठवडय़ाला एका साहित्यिकाच्या साहित्यावर साधक बाधक चर्चा व टीका होत असे. तेथे आचार्य अत्रे आणि दत्तू बांदेकरांची मैत्री जुळली व टिकली.

आचार्य अत्रे हे चार मराठी वृत्तपत्रांचे संस्थापक-संपादक होते. त्यापैकी दोघांचे आयुष्य अल्प होते, पण इतर दोन, ‘मराठा’ आणि (साप्ताहिक) ‘नवयुग’ ही दैनिके त्यांनी अनेक वर्षे मोठय़ा निगुतीने चालवली. त्यांच्या कन्या शिरीष पै यांनीही त्यांच्याच देखरेखीखाली पत्रकारितेचे शिक्षण घेतले. अत्रे यांनी कविता आणि विडंबनाबरोबरच सात नाटकेही लिहिली. त्यात काही विनोदी आहेत. त्यापैकी ‘साष्टांग नमस्कार’ हे रसिकांच्या मनावर मोहिनी करणारे ठरले. ‘लग्नाची बेडी’ हे गंभीर व बोल्ड स्वरूपाचे नाटक खूप गाजले. ते त्यांनी 1936 मध्ये लिहिले. त्या काळी अशी नाटके लिहिण्याचे धाडस अत्रेच करू शकत होते. अत्रे यांनी त्याशिवाय ‘घराबाहेर’ हे नाटक 1934 मध्ये लिहिले, तर ‘भ्रमाचा भोपळा’ हे नाटक 1935 मध्ये लिहिले. त्याचबरोबर 1936 साली त्यांनी ‘उद्याचा संसार’ आणि त्यानंतर दहा वर्षांनी ‘जग काय म्हणेल’ ही नाटके लिहिली. त्यांनी नाटय़ाचार्य राम गणेश गडकरी यांना गुरू मानून सर्व नाटके लिहिली. इब्सेने, मोल्सवर्थ स्टील, कॉग्रिव्ह आदी विदेशी नाटककारांचा त्यांनी अभ्यास केला होता. पुण्यातील परचुरे प्रकाशनने त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित केली.

‘श्यामची आई’ या चित्रपटाने अनेकांचे मन हेलावले. ‘श्यामची आई’ या चित्रपटाला मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1954 साली तो सुरू झाला व पहिलाच पुरस्कार त्यांना मिळाला. पहिले सुवर्ण कमळ मिळविणारा हा चित्रपट. ‘मोरूची मावशी’ हे नाटक तर आजही कहर करते. गोविंदाने प्रेरित होऊन ‘आंटी नंबर वन’ हा चित्रपट केला. कमल हसनचाही एक चित्रपट याच संकल्पनेवर आधारित आहे. त्यांच्या ‘महात्मा फुले’ (1955) या चित्रपटाला राष्ट्रपतींचे रौप्य पदक मिळाले.

तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आचार्य अत्रे यांना ‘रायटर अॅण्ड फायटर ऑफ महाराष्ट्र’ म्हणायचे. 1962 ते 67 या काळात ते दादर मुंबई विधानसभेचे सदस्यही होते. त्यांचा स्वभाव मिश्कील असा होता. 1956-60 दरम्यान संयुक्त महाराष्ट्र समितीचे सदस्य होते. त्या काळात त्यांच्या आंदोलनासाठी त्यांना 1956 मध्ये प्रतिबंधात्मक अटकेखाली अटक करण्यात आली होती. बेळगाव येथे 1955 मध्ये भरलेल्या 38 व्या नाटय़ संमेलनाचे व 10 व्या महाराष्ट्र पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष (1950) बडोदा, इंदूर आणि ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या नावाने सासवडमध्ये आचार्य अत्रे भवन उभारण्यात आले आहे.